मुंबई : कोणतेही बँक अकाउंट ओपन करताना आपल्याला डेबिट कार्ड, चेकबुक, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग अशा सुविधा दिल्या जातात. त्याचप्रमाणे खातेदाराला त्याच्या बँक अकाउंटमध्ये नॉमिनी जोडण्याची सुविधा दिली जाते; जेणेकरून खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पश्चात त्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले पैसे नॉमिनी काढू शकतो.
पूर्वी खातेदार फक्त एकाच व्यक्तीला नॉमिनी ठेवू शकत होता; पण आता या नियमात बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार, खातेदार बँक अकाउंटमध्ये आता एक नाही, तर चार नॉमिनी जोडू शकतो. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत या नव्या नियमासंदर्भात बँकिंग कायदे (सुधारणा) विधेयक, २०२४ सादर केले, ज्याला मंजुरी मिळाली आहे; पण हे नवे विधेयक नेमके काय आहे आणि त्याचा ग्राहकांवर कसा परिणाम होईल ते जाणून घ्या.
नवीन कायदा नेमके काय सांगतो?
कायदे (सुधारणा) विधेयक, २०२४ हे गेल्या मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकांतर्गत आता एक खातेदार त्याच्या बँक खात्यात एका ऐवजी चार नॉमिनी करू शकतो. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलै २०२४ मध्ये अर्थसंकल्पादरम्यान हे विधेयक सादर करण्याबाबतची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत सरकारने एकाच वेळी RBI कायदा १९३४, बँकिंग नियमन कायदा १९४९, SBI कायदा १९५५, बँकिंग कंपनी कायदा १९७०-१९८० मधील अनेक तरतुदींमध्ये सुधारणा केल्या आहेत.
बँक खात्यात एकापेक्षा अधिक नॉमिनी जोडण्याची गरज का भासली?
हे देखील समजून घेणे आवश्यक आहे की, बँक खात्यात एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडण्याचा निर्णय का आवश्यक होता? खरे तर, कोरोनाच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या लोकांनंतर असे अनेक लोक होते, जे मृत व्यक्तीच्या बँक खात्यावर दावा करीत होते. अशा स्थितीत बँकांना अनेक प्रकारच्या कायदेशीर वादांना सामोरे जावे लागले. त्यामुळे हा निर्णय घेण्याची गरज भासू लागली.
कोणत्या नॉमिनीला किती रक्कम मिळावी ते खातेदार ठरविणार
आतापर्यंत खातेदार आपल्या खात्याशी निगडित एक नॉमिनी जोडू शकत होता. परंतु, आता नवीन नियमानुसार, तुम्ही तुमच्या बँक खात्यात चार नॉमिनी जोडू शकाल. त्याशिवाय खातेदार खात्यातील जमा रकमेपैकी कोणत्या नॉमिनीला किती टक्के रक्कम देऊ इच्छितो हेदेखील ठरवू शकेल.
तुम्ही नॉमिनी कसे जोडू शकाल?
जर तुम्हाला खातेधारकाला बँक खात्यात एकापेक्षा जास्त नॉमिनी हवे असतील, तर तुम्ही खाते उघडण्यासाठी फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला तेथे चार नॉमिनी भरण्याचा पर्याय मिळेल. त्या ठिकाणी खातेधारक त्याला हव्या त्या व्यक्तींची माहिती तेथे भरू शकतो. खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यातील रक्कम नियमानुसार त्याने निवडलेल्या नॉमिनीला त्याने ठरविल्यानुसार दिली जाईल.
सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??