‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान: पारध येथे महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर; १२० हून अधिक महिलांची तपासणी
By तेजराव दांडगे - 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियानांतर्गत पारध येथे १२० हून अधिक महिलांची तपासणी

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान: पारध येथे महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर; १२० हून अधिक महिलांची तपासणी
पारध, दि. ३०: १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या राष्ट्रव्यापी अभियानांतर्गत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध (प्रा. आ. उपकेंद्र) येथे महिलांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करत भव्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रेश्मा चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिबिरात गरोदर माता (ANC) आणि प्रसुतीपश्चात माता (PNC) यांना आरोग्य सेवांपासून वंचित राहू नये यासाठी त्यांच्या तपासणीवर विशेष भर देण्यात आला आहे.
कुटुंबाचा केंद्रबिंदू असलेली स्त्री निरोगी राहिल्यास संपूर्ण कुटुंबाची काळजी घेऊ शकते, या विचारावर आधारित हे अभियान आहे. महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी १५ ते २० दिवस विविध ठिकाणी तपासणी सत्रे आयोजित केली जात आहेत.
तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती आणि तपासणीचा तपशील
पारध येथील या शिबिरात महिलांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी बाहेरून तज्ञ डॉक्टर्स बोलावण्यात आले होते. यामध्ये बालरोग तज्ञ डॉ. पंकज हरकुत आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. शमसा खान यांचा समावेश होता.
सकाळपासूनच शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, दुपारपर्यंत जवळपास १२० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यावेळी रक्त व लघवी तपासणीसाठी लॅब टेक्निशियनची सोयही उपलब्ध करून देण्यात आली होती.
किशोरवयीन मुलींसाठी योगा प्रशिक्षण व लसीकरण
आरोग्य तपासणीसोबतच, शिबिरादरम्यान किशोरवयीन मुलींना बोलावून चाटे मॅडम यांनी योगाचे विशेष प्रशिक्षण दिले. या वयोगटातील मुलींमध्ये आढळणारे गायनेक (Gynaec) समस्या, तसेच थकवा किंवा चक्कर येणे यांसारख्या समस्यांवर समुपदेशन करून आवश्यक औषधोपचार पुरविण्यात आले. या व्यतिरिक्त, लहान मुलांचे नियमित लसीकरण देखील या शिबिराचा एक महत्त्वाचा भाग होता.
या आरोग्य शिबिराला प्रा. आ. वालसावंगीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अहमद अलकसेरी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रेश्मा चौधरी, बालरोग तज्ञ डॉ. पंकज हरकुत, स्त्रीरोग तज्ञ डॉ. शमसा खान, योगा प्रशिक्षक चाटे मॅडम, आरोग्य सेवक विनोद सावंगीकर, आरोग्य सेवक बाळोद, आशा गटप्रवर्तक संगीता देशमुख, आशा सेविका संगीता मुळे, अरुणा ढगे ठाकुर, निर्मला राऊत, ज्योती बोर्डे, मंदा जगताप, अनिता गाढे, सरला मोकासरे, आरोग्य कर्मचारी, शिक्षिका, विद्यार्थिनी आणि मोठ्या संख्येने आशासेविका व महिला उपस्थित होत्या.