विशेष वृत्त: जालना मित्र पोर्टल: सरकारी सेवा आता घरपोच!
By तेजराव दांडगे

विशेष वृत्त : नागरिकांना घरपोच सरकारी सेवा उपलब्ध करून देणारा, ‘जालना मित्र पोर्टल’ जिल्ह्याचा डिजिटल उपक्रम
जालना, दि.23 : महाराष्ट्रात डिजिटल युगाची नवी सुरुवात जालना जिल्ह्यात झाली आहे. जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या “जालना मित्र पोर्टल” मुळे नागरिकांना तब्बल 19 शासकीय सेवा घरबसल्या मिळणार आहेत. केवळ 100 रुपये अतिरिक्त शुल्क भरून आता आधार कार्डपासून वृद्धत्व पेन्शनपर्यंतची कामे नागरिकांच्या घरीच पूर्ण केली जाणार आहेत. या उपक्रमामध्ये राज्यात जालना जिल्हा हा पहिला ‘डिजिटल जिल्हा’ होण्याकडे वाटचाल करीत आहे.
जालना मित्र पोर्टल म्हणजे काय ? शासकीय कामासाठी विविध कार्यालयात सामान्य नागरिकांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागते. शासकीय कार्यालयात अनेक फेऱ्या मारण्यात वेळ आणि पैशाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा अंतर्गत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवा नागरीकांना घरपोच मिळाव्यात यासाठी जालना जिल्ह्याने ‘जालना मित्र पोर्टल’ हा नावीन्य पूर्ण उपक्रम जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आला आहे. ‘जालना सेवा पोर्टलवर’ यासाठी जिल्हातील कुठल्याही नागरिकांने आपल्या कामासंबंधी या पोर्टलवर जावून अपॉइंटमेंट बुक करायची आणि प्रतिनिधी थेट त्यांच्या घरी येऊन ती सेवा उपलब्ध करून देणार आहे.
‘जालना मित्र’ या पोर्टलमध्ये नागरिक स्वतः नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्राची अपॉइंटमेंट घेवू शकतात. त्याप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्रचालक संबंधित नागरिकाच्या घरी जावून सर्व कागदपत्रे घेवून आपले अर्ज भरून घेतील. यासाठी नागरिकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाद्वारे लॉगिन करायचे आहे. आपल्याला ज्या विभागाशी निगडित काम आहे, तो विभाग निवडून, त्या विभागातील सेवा निवडायची आहे. नंतर आपणास त्या सेवेसाठी आवश्यक फिस, कागदपत्रे, भेट व दिनांक उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच, या पोर्टलवरून अपॉइंटमेंट घेतांना त्या सेवेसाठी लागणारे शासकीय शुल्क आणि घरपोच सेवेसाठी आकारण्यात येणारे 100 रूपये शुल्क हे पोर्टलवर दिसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी तेवढेच पैसे द्यावेत.
पोर्टलवरील 13 विभाग: अन्न व नागरी पुरवठा विभाग, पासपोर्ट-परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, पोलीस/गृह विभाग, शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, आयकर विभाग, ग्रामीण विकास विभाग,भूमी अभिलेख विभाग, समाज कल्याण व सामाजिक न्याय विभाग, आरोग्य विभाग,डिजिटल जीवन प्रमाण,महसूल विभाग,सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय या विभागाचा समावेश आहे.
कोणत्या सेवा उपलब्ध ? जीवनावश्यक सेवा, राशन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट पोलीस व्हेरिफिकेशन, व्यवसायिक सेवा, MSME नोंदणी, FSSAI परवाना, सामाजिक सेवा, वृद्धत्व पेन्शन, निवास दाखला, डिजिटल सेवा, जीवन प्रमाणपत्र, भूमी अभिलेख (7/12, फेरफार इत्यादी.)
नागरिकांना काय फायदा होणार ? जालना मित्र या एका पोर्टलवर 13 विभागाच्या 19 सेवा नागरिकांना घरपोच उपलब्ध होणार आहे. या पोर्टलमुळे नागरिकांना विहीत कालावधीत सेवा उपलब्ध होणार असून, नागरिकांची वेळेची बचत होणार आहे. तसेच दिवसभराची कामे देखील आता काही तासातच पूर्ण होण्यास मदत होणार आहेत. यामुळे नागरिकांच्या प्रवासाचा खर्च शून्य होणार असुन पैशांची बचत होणार आहे. तसेच पारदर्शक शुल्क राहणार असुन कोणतेही लपविलेले शुल्क घेण्यात येणार नाही. तसेच नागरिकांना 24X7 ऑनलाइन बुकिंग सुविधा उपलब्ध असणार आहे.
प्रशासनाची भूमिका: जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल या जालना मित्र पोर्टल बाबत म्हणाल्या की, “हा उपक्रम नागरिक सेवेत नवा मानदंड ठरेल. नागरिकांना आता कार्यालयात यायची गरज पडणार नाही. तर प्रशासनच आता नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचणार आहे. पारदर्शकता, वेळेची बचत आणि विश्वासार्हता हे या उपक्रमाचे मुख्य स्तंभ आहेत.
जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, “जालना जिल्हा डिजिटल इंडियाच्या दिशेने अग्रगण्य ठरत आहे. हा उपक्रम इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरेल.”
नागरिकांची मते: जालना तालूक्यातील वझर सरकटे येथील विद्यार्थी म्हणतो की, “मी इयत्ता दहावीत शिकत असून, मला रहिवासी प्रमाणपत्र काढायचे होते. मी जालना मित्र पोर्टलवर जाऊन बुकींग केली. लगेचच माझ्या जवळील आपले सरकार सेवा केंद्रावरील मित्राने माझे कागदपत्रे घरी येऊन घेतली. तसेच मला घरी प्रमाणपत्र आणून दिले. जालना जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे आम्हा विद्यार्थ्यांना प्रशासनाप्रती आदर वाढला असुन यामुळे आमचा अभ्यासाचा देखील वेळ सुद्धा वाया गेला नाही.”
नागरिकांनी ‘जालना मित्र पोर्टल’ वापरण्यासाठीची सोपी पद्धत (3 स्टेप्स असुन) https://jalnamitra.in या पोर्टलवर मोबाइल नंबरने लॉगिन करावे. सेवा व विभाग निवडा, अपॉइंटमेंट बुक करा. शुल्क + ₹100 घरपोच सेवा फी भरावी आणि सेवा घरपोच प्राप्त करुन घ्यावी.
संपर्क कुठे करायचा ? या सेवेसाठी नागरिकांनी https://jalnamitra.in या संकेतस्थळास भेट द्यावी. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांच्याकडे आतापर्यंत या पोर्टलमार्फत 20 सेवांसाठी 61 नागरिकांनी नोंदणी केली आहे. यापैकी 28 नागरिकांच्या अर्जाबाबतचे कागदपत्रे हस्तगत करण्यात आले असून, पुढील कार्यवाही सुरू आहे. त्यापैकी 08 लोकांच्या घरी जाऊन सदरील सेवा जालना मित्र पोर्टलने उपलब्ध करुन दिली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांसाठी ‘जालना मित्र पोर्टल’ ही ऑनलाईन सेवा नक्कीच फायदेशिर आणि उपयुक्त ठरणार आहे.