जालना जिल्ह्यात अल्पवयीन वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम; पालकांनाही दणका
जालना शहरात अल्पवयीन वाहनचालकांवर पोलिसांची मोठी कारवाई; २९० चालकांकडून ६.३८ लाख दंड वसूल

जालना जिल्ह्यात अल्पवयीन वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम; पालकांनाही दणका
जालना, १० सप्टेंबर: जालना शहर आणि जिल्ह्यात अल्पवयीन वाहन चालकांमुळे होणाऱ्या अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन, जालना पोलिसांनी एक विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेत एकूण २०९ अल्पवयीन चालक सापडले असून, त्यांच्याकडून ६,३८,१०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर, पोलिसांनी त्यांच्या पालकांनाही कडक समज दिली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अल्पवयीन चालकांमुळे होणाऱ्या अपघातांच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या आदेशानुसार, ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेसाठी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
सकाळपासूनच पोलीस कर्मचाऱ्यांनी शाळा, कॉलेज, शिकवणी वर्ग आणि शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये तपासणी सुरू केली. यात २०९ अल्पवयीन मुले-मुली वाहने चालवताना आढळली. पोलिसांनी या मुलांना त्यांच्या वाहनांसह पोलीस स्टेशन आणि शाखा कार्यालयात आणले आणि त्यांच्या पालकांना बोलावून घेतले.
यावेळी, अल्पवयीन चालकांना मोटार वाहन कायद्याची माहिती देऊन त्यांना पुन्हा असे कृत्य न करण्याची समज देण्यात आली. त्याचबरोबर, त्यांच्या पालकांनाही त्यांच्या पाल्याच्या सुरक्षिततेची आणि कायद्याच्या गंभीर परिणामांची जाणीव करून देण्यात आली. भविष्यात जर कोणताही अल्पवयीन चालक वाहन चालवताना आढळल्यास, त्याच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल आणि न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई जिल्हातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभारी ठाणेदार आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहभागाने यशस्वी झाली. यामुळे, अल्पवयीन वाहन चालकांना आणि त्यांच्या पालकांना एक कडक संदेश मिळाला आहे.