विशेष लेख: जागतिक लोकसंख्या दिन – सुखी जीवनाचा उपाय लोकसंख्या वाढीवर मात
By तेजराव दांडगे

विशेष लेख: जागतिक लोकसंख्या दिन – सुखी जीवनाचा उपाय लोकसंख्या वाढीवर मात
दिनांक, 10 जुलै 2025:- जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी 11 जुलै रोजी जगभरात साजरा केला जातो. 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 1 अब्ज झाल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) निदर्शनास आणले. तेव्हापासून, वाढत्या लोकसंख्येच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. पहिला जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 1989 रोजी साजरा करण्यात आला होता.
या वर्षीचे घोषवाक्य आहे: ‘आई होण्यासाठी योग्य वय तेव्हा, शरीर व मनाची तयारी जेव्हा.’
जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येक दांपत्याने कुटुंब नियोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली पाहिजे. लोकसंख्या वाढीमुळे उद्भवणाऱ्या विविध समस्या लक्षात घेऊन, शासनाने 1951-52 च्या पंचवार्षिक योजनेत कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा समावेश केला आणि 1952 पासून राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम अंमलात आणला.
आपल्याला माहीत आहे की, जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश भारत आहे, तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. लोकसंख्या वाढ हा एक चिंतेचा विषय आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी, गरिबी, अन्नधान्य तुटवडा, निरक्षरता, गर्दी, प्रदूषण, रुग्णालयात रुग्णांची वाढ, शिक्षणाचा अभाव, वाढत्या शहरीकरणामुळे झाडांची घट आणि परिणामी कमी पाऊस व कोरडा दुष्काळ यांसारख्या समस्या निर्माण होतात. याशिवाय, नैतिकता आणि सामाजिक पातळी खालावून गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होते. जर हे सर्व लोकसंख्या वाढीमुळे होत असेल, तर यात चांगल्या दृष्टिकोनातून बदल होणे आवश्यक आहे. म्हणूनच म्हणतात: ‘लहान कुटुंब, सुखी कुटुंब.’
लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवले जात आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम. शासकीय रुग्णालयांमधून कुटुंब नियोजनाची माहिती आणि त्यासंबंधीच्या उपक्रमांबद्दल सांगितले जाते. कुटुंब कल्याण कार्यक्रमात दोन प्रकारच्या पद्धती आहेत: एक कायमची नसबंदी शस्त्रक्रिया आणि दुसरा प्रकार तात्पुरती कुटुंब नियोजन पद्धत. कायमच्या पद्धतीमध्ये स्त्री आणि पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते, तर तात्पुरत्या पद्धतीमध्ये गर्भनिरोधक गोळ्या, अंतरा इंजेक्शन, कॉपर-टी, निरोध इत्यादींबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण केली जाते. यामुळे लोकसंख्या वाढीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी लहान कुटुंबाचे फायदे याबाबत जनजागृती, बालविवाह कायद्याची अंमलबजावणी, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाची माहिती आणि प्रत्येक कुटुंबाने परिवार नियोजनाचा सल्ला घेऊन त्याची अंमलबजावणी करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असले पाहिजे.
आवाहन: लहान कुटुंब सुखी कुटुंब!
(डॉ. जयश्री भुसारे)
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद, जालना.