जालन्यात सव्वा कोटींचा सोयाबीन घोटाळा; १० जणांवर गुन्हा दाखल, अटकेची प्रक्रिया सुरू!
By तेजराव दांडगे

जालन्यात सव्वा कोटींचा सोयाबीन घोटाळा; १० जणांवर गुन्हा दाखल, अटकेची प्रक्रिया सुरू!
जालन्यातील भोकरदन तालुक्यात कोट्यवधींच्या सोयाबीन घोटाळा प्रकरणी पारध येथे गुन्हा दाखल; अनेकांवर अटकेची टांगती तलवार!
पारध, दि. 23: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात बोगस सातबारा उतारे आणि बनावट पीकपेऱ्याच्या आधारे शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण १० आरोपीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२४-२५ च्या हंगामात “वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्यादित, जानेफळ गायकवाड, तालुका भोकरदन, जिल्हा जालना” या संस्थेचे अध्यक्ष, संचालक आणि काही खाजगी व्यापाऱ्यांनी संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
नेमका काय आहे प्रकार?
आरोपीतांनी तांत्रिक पद्धतीने बनावट ७/१२ उतारे तयार केले. या बनावट उताऱ्यांवर त्यांनी खोटा पीकपेरा दर्शवून अंदाजे २०९३ क्विंटल जास्तीच्या सोयाबीनची नोंदणी केली. या बनावट नोंदीच्या आधारे त्यांनी तब्बल १,०२,३८,९५६ (एक कोटी दोन लाख अडतीस हजार नऊशे छप्पन) रुपयांची सोयाबीन विक्री करून शासनाची दिशाभूल केली आणि फसवणूक केली. बनावट सातबारा कागदपत्रे खरी असल्याचे भासवून ती वापरल्याचेही दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
कोणावर दाखल झाला गुन्हा?
या प्रकरणी फिर्यादी विजय उत्तमराव राठोड, वय ४४ वर्षे, प्रभारी जिल्हा पणन अधिकारी, जालना यांच्या तक्रारीवरून पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीतांमध्ये भागवत सुदाम दौड, सुनील शिवाजी शिंदे, अनिल शिवाजी घुले, सुरेश कैलास सोनवणे, रमेश ठकुबा गायकवाड, कृष्णा साईनाथ गायकवाड, गोपीनाथ कौतीक दौड, सचिन भगवान दौड (सर्व राहणार जानेफळ गायकवाड, तालुका भोकरदन, जिल्हा जालना), कृष्णा सुभाष आन्वेकर आणि पवन वाघ (रा. वरूड बु., ता. भोकरदन, जि. जालना) यांचा समावेश आहे.
जालना पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक एस.डी. माने हे स्वतः या गुन्ह्याचा तपास करत आहेत. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहे.
पुढील तपास आणि अटकेची प्रक्रिया सुरू:
सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी संशयितांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे आणखी किती दूरवर पसरले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.