भटकंती करणाऱ्या वृद्धाला सामाजिक कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमात केले दाखल
By अनिल जाधव

भटकंती करणाऱ्या वृद्धाला सामाजिक कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमात केले दाखल
चिखली -: शहरातील बस स्थानक परिसरात भटकंती करून भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका वृद्ध आजोबांची सामाजिक कार्यकर्त्यांनी दखल घेत त्यांना मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, भोकर ता. चिखली येथे दाखल केले.
सदर वृद्ध आजोबा हे मूळचे अकोला जिल्ह्यातील असून ते भटकंती करत चिखली बस स्थानक परिसरात आढळून आले. सामाजिक कार्यकर्ते सुमेध जाधव यांनी त्यांची आपुलकीने विचारपूस केली असता, त्यांना दोन मुले असूनही ते त्यांचा सांभाळ करत नाहीत, ही शोकांतिका समोर आली. ज्या वडिलांचे बोट धरून आपण हे जग पाहतो, त्यांच्या नावाने ओळखले जातो; म्हातारपणी आपण त्यांचा सहारा न बनता त्यांना भटकंती करण्यासाठी मजबूर करतो, ही भयावह परिस्थिती आहे.
आजोबांची व्यथा ऐकताच सुमेध जाधव यांनी तातडीने माजी सरपंच भरत जोगदंडे, प्रहारचे धनंजय जटाळे, पुरुषोत्तम चिंचोले, गणेश श्रीवास्तव यांच्या सहकार्याने त्या निराधार आजोबांना तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात प्रवेश मिळवून दिला.
मानवसेवा प्रकल्प अंतर्गत कायम विनाअनुदानित तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे वयोवृद्ध आणि डिपेन्डंट व्यक्तींसाठी सर्व सोईसुविधांसह निवासी आश्रम गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. येथे गरजवंत निराधार वयोवृद्ध, चालते फिरते भिक्षा मागणारे आजोबा-आजी, डिपेन्डंट व्यक्ती इत्यादींसाठी सर्व प्रकारची निःस्वार्थ मोफत सेवा दिली जात आहे. तर कुठेही निराधार बेघर, मुलं-मुली व इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांचा सांभाळ करत नसतील अशा वृद्धांनी 8855850378 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी केले आहे.