हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
By तेजराव दांडगे

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
जालना, दि.20 : “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे 24 व 25 जानेवारी, 2026 रोजी मोदी मैदान, नांदेड येथे भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्यातील सर्व समाजातील भाविक, सामाजिक संस्था, संघटना व स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी सकारात्मकतेने पुढाकार घेवून आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
येथील जिल्हा नियोजन सभागृहात ”हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, किशन राठोड, लखीम सिंग, विलास राठोड, महंत नेहरुजी महाराज आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनामार्फत काटेकोर नियोजन करण्यात या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनामार्फत काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, आणि सीएसआरच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातून शक्य तेवढी मदत पोहचविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन आणि समाज घटकांमार्फत करण्यात येत आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना व्हावी यासाठी विविध माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयामध्ये प्रभात फेरीचे आयोजन करुन, सतिंदर सरताज यांचे भक्ती गीत गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करुन या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर जी यांचे महान कार्य आणि हौतात्म्याचा इतिहासाची माहिती विद्यार्थी-विद्यार्थीना देण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडिया, होर्डिग्स, फ्लेक्स, प्रसिध्दी पत्रके, चित्ररथ, शासकीय-निमशासकीय कार्यालये, चित्रपट गृहे, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, मुख्य चौक व मुख्य रस्त्यांवर फ्लेक्स, बॅनर, होर्डिग्स् आदीच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील जास्तीत-जास्त भाविकांना या कार्यक्रमास उपस्थित राहाता यावे यासाठी विशेष रेल्वे आणि बसेसचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व समाज एकत्र येवून त्यांच्यात देशभक्ती निर्माण होणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन जिल्हाधिकरी श्रीमती मित्तल यांनी केले.
यावेळी विविध समाजातील मान्यवर आणि नागरिकांची उपस्थिती होती.


