जालन्यातील पारधमध्ये धक्कादायक घटना: पतीने पत्नीची हत्या करून केली आत्महत्या
By तेजराव दांडगे

जालन्यातील पारधमध्ये धक्कादायक घटना: पतीने पत्नीची हत्या करून केली आत्महत्या
जालना, दि. २३ (प्रतिनिधी): भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक. गावातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची लोखंडी रॉडने हत्या केली आणि त्यानंतर स्वतः राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
ही घटना शुक्रवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पारध येथील रहिवासी समाधान रंगनाथ आल्हाट (मयत) याने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. याच संशयातून त्याने क्रूरपणे पत्नीवर हल्ला केला. लोखंडी रॉडने डोक्यात मारून त्याने पत्नीला गंभीर जखमी केले, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने त्याच घरात पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.
गुन्हा दाखल, पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणी मयत महिलेची आई मीराबाई दिलीप मोकासे (रा. वसई, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पारध पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा (गु.र.नं. २११/२०२५) दाखल केला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या आदेशानुसार, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही.एस. नेमाने करत आहेत. पती-पत्नीमधील वादाचे मूळ कारण आणि त्यामागील सखोल बाबींचा शोध पोलीस घेत आहेत. या दुहेरी घटनेमुळे संपूर्ण पारध गावात शोककळा पसरली आहे.