बुलढाण्याच्या प्रा. शालिनी काटोले यांना राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२५ प्रदान: जनसेवेचा गौरव!
By अनिल जाधव

बुलढाण्याच्या प्रा. शालिनी काटोले यांना राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२५ प्रदान: जनसेवेचा गौरव!
कोल्हापूर: अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या बहुजन साहित्य संघाच्या ज्येष्ठ पदाधिकारी आणि गेल्या ३०-३५ वर्षांपासून सामाजिक व जनसेवेत स्वतःला वाहून घेणाऱ्या, तसेच केंद्रीय मानवाधिकार संघटना, नवी दिल्लीच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. शालिनी अरुण काटोले (चिखली) यांना “राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार – २०२५” प्रदान करण्यात आला आहे.
मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर यांनी त्यांच्या अविरत सेवाभावी कार्याची दखल घेत, हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला. २६ जून २०२५ रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी, कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
प्रा. शालिनी काटोले या सुप्रसिद्ध श्री. शिवाजी शिक्षण संस्था, चिखली येथील विज्ञान महाविद्यालयातून विभागप्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांची ओळख एक निस्वार्थ आणि सेवाव्रती कार्यकर्ती अशी आहे. यापूर्वीही त्यांना विविध संस्था व मंडळांकडून अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या गौरवशाली पुरस्कारामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.