जालना जिल्ह्यात हातभट्टीवर पोलिसांचा ‘मास रेड’: ७० ठिकाणी ४० लाखांहून अधिक दारू नष्ट!
By तेजराव दांडगे

जालना जिल्ह्यात हातभट्टीवर पोलिसांचा ‘मास रेड’: ७० ठिकाणी ४० लाखांहून अधिक दारू नष्ट!
जालना, १९ जुलै: अवैध हातभट्टी दारूच्या विरोधात जालना पोलिसांनी आज एक मोठी आणि धडक कारवाई केली. पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र तथा विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार, जालना जिल्ह्यात पहाटे ६ वाजल्यापासून ‘मास रेड’ (सामूहिक छापा मोहीम) राबवण्यात आली.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी (जालना), विशाल खांबे (अंबड), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांच्यासह ४० अधिकारी आणि १७३ पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली.
या मोहिमेदरम्यान, जालना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ७० ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले. यामध्ये ४९६९ लिटर गावठी हातभट्टी दारू आणि ३३६२० लिटर दारू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व रसायन (सडवा) असा एकूण ४०,७०,८५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि तो जागेवरच नष्ट करण्यात आला.
या कारवाईत ७० आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलिसांची ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे.