पोलिसांनी जालना येथे दरोड्याचा छडा लावला, एक अटकेत तर अल्पवयीन ताब्यात
By तेजराव दांडगे

पोलिसांनी जालना येथे दरोड्याचा छडा लावला, एक अटकेत तर अल्पवयीन ताब्यात
जालना, 23 जुलै 2025 – जालना-देऊळगाव राजा रोडवर काल (मंगळवार, 22 जुलै 2025) झालेल्या दरोड्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एका आरोपीताला अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 जुलै रोजी दोन व्यक्ती कामानिमित्त देऊळगाव राजा रोडवरून आनंदगडजवळून परत जात असताना, दोन अज्ञात आरोपीतांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड आणि दोन मोबाईल फोन जबरदस्तीने चोरले होते. याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पोलीस निरीक्षक जाधव यांनी आपल्या पथकातील अधिकारी आणि अंमलदारांना या गुन्ह्याचा छडा लावण्याचे निर्देश दिले.
तपासादरम्यान, 22 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की, हा गुन्हा अभय दिलीप डोंगरे (वय 21, रा. कन्हैयानगर, जालना) याने एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने केला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अभय दिलीप डोंगरेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालासह एकूण 26,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता तो उघडकीस आणण्यात आला आहे. अटकेतील आरोपीताला पुढील तपासासाठी तालुका जालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, आणि पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, भाऊराव गायके, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, संदीप चिंचोले, संजय सोनवणे, तसेच चालक अशोक जाधवर यांनी केली.