परतूर पोलिसांची “ऑपरेशन खंजीर”: धारदार शस्त्रासह तब्बल १४ चोरीच्या बाईक्स जप्त!
By तेजराव दांडगे

परतूर पोलिसांची “ऑपरेशन खंजीर”: धारदार शस्त्रासह तब्बल १४ चोरीच्या बाईक्स जप्त!
जालना: (दि. ०४ जून २०२५) जालना जिल्ह्यातील परतूर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत, खंजीर बाळगणाऱ्या एका आरोपीताला अटक करून त्याच्याकडून तब्बल १४ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे जालना, परभणी आणि बुलढाणा जिल्ह्यांमधील १३ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे १२ लाख ३० हजार रुपये असून, अजूनही काही मोटारसायकली मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
कशी मिळाली माहिती?
परतूर पोलीस स्टेशन अंतर्गत वाटूर दुरक्षेत्र हद्दीतून दिनांक ०२ जून २०२५ रोजी एका HF डिलक्स मोटारसायकलची (क्र. MH-21-BJ-6311) चोरी झाली होती. ही चोरीची मोटारसायकल आरडा तोलाजी गावातील एका व्यक्तीकडे असल्याची गोपनीय माहिती परतूर पोलिसांना मिळाली.
खंजीरधारी आरोपीत गजाआड!
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि अभिषेक प्रल्हाद धनवडे (रा. आरडा तोलाजी, ता. मंठा, जि. जालना) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ एक धारदार खंजीर आणि एक स्प्लेंडर कंपनीची विनाक्रमांकाची मोटारसायकल आढळून आली.
सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी “खाक्या” दाखवताच त्याने आपले दोन साथीदार असल्याचे कबूल केले आणि मौजपुरी हद्दीतून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
साखळीतील दुसरे महत्त्वाचे दुवे:
त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ त्याचा साथीदार अमोल गणेश चव्हाण (रा. आरडा तोलाजी) यालाही ताब्यात घेऊन अटक केली. ३ दिवसांच्या पोलीस कोठडीदरम्यान, या आरोपीतांकडून जालना, परभणी आणि बुलढाणा जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या ठिकाणांवरून चोरून आणलेल्या एकूण १४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या मोटारसायकलींची अंदाजे किंमत १२ लाख ३० हजार रुपये आहे.
शस्त्र अधिनियमांतर्गतही गुन्हा दाखल:
या आरोपीतांवर भारतीय शस्त्र अधिनियमन्वये वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सफौ. नंदु खंदारे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीतांकडून आणखी चोरीच्या मोटारसायकली मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जप्त केलेल्या मोटारसायकलींची यादी:
जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींमध्ये विविध मॉडेल्सचा समावेश आहे, ज्यात HF डिलक्स, होंडा डिलक्स, बजाज प्लॅटिना, स्प्लेंडर प्लस, युनिकॉर्न आणि शाईन या गाड्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यात काही विनाक्रमांकाच्या मोटारसायकलींचाही समावेश आहे, ज्यांचे चेसीस क्रमांक पोलिसांनी मिळवले आहेत.
नागरिकांना आवाहन:
या यशस्वी कारवाईमुळे १३ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे, पोस्टे परतूर यांनी ज्या नागरिकांच्या मोटारसायकली चोरीला गेल्या असतील, त्यांनी परतूर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच, चोरीच्या मोटारसायकली कोणीही विकत घेऊ नयेत, असेही त्यांनी सांगितले आहे, कारण अशा व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
पथकाचे कौतुक:
ही महत्त्वपूर्ण कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक, आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर दादाहरी चौरे, पोलीस निरीक्षक परतूर मच्छींद्र सुरवसे, पोउपनि अमोल रावते, सफौ. नंदु खंदारे, पोहेकॉ किरण चव्हाण, पोकॉ दिपक आढे, पोकॉ अच्युत चव्हाण, पोकॉ नरेद्र चव्हाण, पोअं ज्ञानेश्वर वाघ, पोकॉ सुनिल इलग, पोअं वंदन पवार आदींनी केली आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.