सरकारी शाळेत प्रवेश घेणाऱ्या पाल्यांच्या पालकांना घरपट्टीतून मुक्ती! भायडी, तळणी, विरेगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय!
By गौतम वाघ

सरकारी शाळेत प्रवेश घेणाऱ्या पाल्यांच्या पालकांना घरपट्टीतून मुक्ती! भायडी, तळणी, विरेगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय!
जालना (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी देण्यासाठी भोकरदन तालुक्यातील भायडी, तळणी आणि विरेगाव या ग्रुप ग्रामपंचायतीने एक धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता या तिन्ही गावांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत आपल्या पाल्याचे नाव दाखल करणाऱ्या पालकांना सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी घरपट्टी, नळपट्टीसह सर्व करातून पूर्णपणे सूट मिळणार आहे!
हा महत्त्वपूर्ण ठराव ग्रुप ग्रामपंचायत भायडी, तळणी, विरेगावच्या सरपंच सौ. रेखाताई केशवराव पाटील जंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे, या उदात्त हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीला ग्रा.पं. सदस्य संजय तोताराम पिसे, श्रीमती कलावती रामकृष्ण पगारे, योगिता संतोष दळवी, उपसरपंच गंगा गणपत दसपूते, लता रामचंद्र गायके, सुनिता प्रल्हाद सोनवणे, रुखमनबाई शालिक बोर्ड, सांडु गयबु निकाळजे, शिवाजी सखाराम जंजाळ यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.
‘मोफत शिक्षणातून प्रगतीचे शिखर’
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल बोलताना लोकजागर पक्षाचे नेते केशवराव पाटील जंजाळ यांनी आपले मत व्यक्त केले. “या वर्षापासून जिल्हा परिषद शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू झाला आहे, जो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेला एक अत्यंत चांगला निर्णय आहे. यामुळे गोरगरीब जनतेची मुले मोफत शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर पोहोचू शकतील आणि आपल्या आई-वडिलांचे व गावाचे नाव उज्ज्वल करतील,” असे ते म्हणाले.
याशिवाय, सरपंच सौ. रेखाताई जंजाळ आणि केशवराव पाटील जंजाळ यांनी सांगितले की, तिन्ही ग्रुप ग्रामपंचायतींसाठी नवीन इमारती बांधण्यासाठी निधी मंजूर करून घेण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी स्वरूपात मागणी करण्यात येणार आहे.
ग्रामसेवक गजानन तायडे यांनी हा ठराव मंजूर होताच तिन्ही ग्रुप ग्रामपंचायतींच्या मुख्याध्यापकांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे. या प्रसंगी तिन्ही ग्रुप ग्रामपंचायतींचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी या ऐतिहासिक निर्णयाचे प्रचंड कौतुक केले आहे.