पारध पोलिसांची कारवाई! अनवापाडा गावात ३६ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By तेजराव दांडगे

पारध पोलिसांची कारवाई! अनवापाडा गावात ३६ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पारध, दि. ०७ : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध पारध पोलिसांनी कारवाई केली आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनवापाडा गावामध्ये गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून सुमारे ३६ हजार ५४० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला असून, दोन आरोपीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईची माहिती:
सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांना गुप्त बातमीदारामार्फत अनवापाडा गावामध्ये काही इसम प्रतिबंधित गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सपोनि संतोष माने यांनी तातडीने पीएसआय वाल्मिक नेमाने, पोलीस अंमलदार निकम, जाधव, गवळी आणि पाटील अशांचे एक पथक तयार करून अनवापाडा गावाकडे रवाना केले.
गुटखा जप्त:
पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी असलेल्या आई किरण जनरल स्टोअर्सवर छापा टाकला. यावेळी त्यांना दोन इसम –
१) रामेश्वर लक्ष्मण डोळस (वय ३२, रा. अनवापाडा, ता. भोकरदन, जि. जालना), २) भगतसिंग पदमसिंह बलरावत (वय १९, रा. अनवापाडा, ता. भोकरदन, जि. जालना)
यांच्या ताब्यात एकूण ३६,५४०/- (छत्तीस हजार पाचशे चाळीस) रुपयांचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा मिळून आला.
ताब्यात घेण्यात आलेल्या या दोन्ही आरोपीतांविरुद्ध पारध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.