अवयवदान पंधरवड्याला जालना जिल्ह्यात सुरुवात; ‘अवयवदान करा, जीवन वाचवा’ – जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांचे आवाहन
By तेजराव दांडगे

अवयवदान पंधरवड्याला जालना जिल्ह्यात सुरुवात; ‘अवयवदान करा, जीवन वाचवा’ – जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांचे आवाहन
जालना, दि. ०४ : मानवी जीवनात अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये ३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ‘अवयवदान पंधरवडा’ साजरा केला जात आहे. या पंधरवड्याच्या माध्यमातून अवयवदानाविषयी समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. जयश्री भुसारे यांनी यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढून जनतेला अवयवदान करण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे अवयवदान?
अवयवदान हे दोन प्रकारे करता येते: मृत्यू पश्चात किंवा ‘ब्रेन डेथ’ (मेंदू मृत) झाल्यावर. यात नेत्रदान, यकृत, हृदय, किडनी, फुफ्फुसे, त्वचा, हाडे आणि आतडे यांसारख्या अवयवांचे दान करता येते. याशिवाय, जिवंत असतानाही किडनी, स्वादुपिंडाचा काही भाग किंवा यकृताचा छोटा भाग दान करता येतो. अवयवदानासाठी कोणतीही व्यक्ती स्वेच्छेने नोंदणी करू शकते, तर ब्रेन डेड व्यक्तीच्या बाबतीत तिचे नातेवाईक हा निर्णय घेऊ शकतात.
देहदान म्हणजे काय?
अवयवदानाप्रमाणेच ‘देहदान’ ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. मृत्यू पश्चात देहदान केल्यास वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि प्रात्यक्षिकांसाठी त्याचा उपयोग होतो. अवयवदान आणि देहदान दोन्हीही मानवी जीवनाला एक नवी दिशा देतात.
सामाजिक जबाबदारी आणि कायदेशीर बाबी
अवयवदान करणे ही एक सामाजिक जबाबदारी असून, यामुळे गरजू रुग्णाला जीवनदान मिळते. हेच ‘अंगदान-जीवन संजीवनी’ अभियानाचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे, अवयवदानाच्या बदल्यात कोणत्याही प्रकारचा आर्थिक मोबदला घेणे कायद्याने गुन्हा आहे.
नोंदणीसाठी आवाहन
जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांना अवयवदान करायचे आहे त्यांनी प्रसिद्धीपत्रकासोबत दिलेल्या QR कोडवर स्कॅन करून नोंदणी करावी किंवा जवळच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा.
हे अभियान केवळ अवयवदान पंधरवड्यापुरते मर्यादित न राहता, अवयवदानाचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावा, हाच यामागील उद्देश आहे.