खान्देश स्तरीय नाट्यसंमेलनाच्या तयारीला वेग; तयारी अंतिम टप्यात…

अमळनेर(प्रतिनिधी) युवा नाट्यकलावंत व नाट्य साहित्य रसिकांच्यासाठी मांदियाळी ठरणाऱ्या येथिल खान्देश स्तरीय नाट्यसंमेलनाच्या तयारीला वेग आला असून छ. शिवाजी महाराज नाट्यगृह येथे पू. सानेगुरुजी नाट्य साहित्य नगरीतील तयारी अंतिम टप्यात आली आहे.
खान्देशात प्रथमच होत असलेल्या युवा नाट्य साहित्य समेंलनामुळे अमळनेरकडे संपुर्ण खान्देशवासीयांच्या नजरा लागलेल्या आहेत.
साहित्यातील नाट्य साहित्य प्रकाराला यामुळे खान्देशात चालना मिळेल त्याबरोबरच बदलत्या काळानुसार नाट्य साहित्यातील नवनवीन प्रवाह रसिकांना प्रेक्षकांना अनुभवा यला मिळतील. यादृष्टीने संमेलनाचे आयोजक महाराष्ट्र साहित्य परिषद अमळनेर विविध समित्यांच्या व कार्यकर्त्यांच्या मदतीने तयारीस लागले आहेत.
पू.सानेगुरुजी नाट्य साहित्य नगरीत पुस्तक प्रदर्शन व विक्री स्टॉल, विविध साहित्य स्टॉल,नाट्य साहित्य परंपरेचे माहिती देणारे प्रदर्शन, चित्रमय माहिती फलक यासह विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांच्या आयोजनांची काळजी संयोजक घेत आहेत.
सभागृहात येणाऱ्या रसिक प्रेक्षकांना प्रत्येक गोष्टीचा आंनद घेता यावा म्हणून बारीक बारीक गोष्टींची काळजी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे स्थानिक पदाधिकारी घेत आहेत.
वातावरण निर्मितीसाठी विविध सजावटी परिसरसह संपुर्ण शहरात करण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात येत आहे.
विविध स्थानिक संस्था, सांस्कृतिक व नाट्यमंडळ,स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सहकार्याने महाराष्ट्र साहित्य परिषद अमळनेर शाखेचे नियोजन सुरू आहे. म.सा. प.चे कार्याध्यक्ष रमेश पवार, युवा नाट्य साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डिगंबर महाले,कोषाध्यक्ष संदिप घोरपडे ,अध्यक्ष नरेंद्र निकुंभ,उपाध्यक्ष शरद सोनवणे, यासह पू. सानेगुरुजी ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, प्रा.लिलाधार पाटील, रणजित शिंदे यांचेसह युवा कार्यकर्ते सुनिल भामरे, आदिंनी यावेळी पू. साने गुरुजी नाटय गृहातील अंतिम टप्प्यातील तयारीचा आढावा घेतला.