नमो शेतकरी महासन्मान निधी: ७वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात!
Namo Shetkari Mahasamman Nidhi: 7th installment directly to farmers' accounts!

नमो शेतकरी महासन्मान निधी: ७वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात!
मुंबई: राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा ७वा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला आहे. आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातून ९१,६५,१५६ शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये तब्बल १,८९२.६१ कोटी रुपये वितरित करण्यात आले. यामुळे, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
योजनेचा उद्देश आणि लाभ
केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’च्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेती खर्चासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. केंद्र सरकारकडून वर्षाला ६,००० रुपये मिळतात, तर राज्य सरकारकडूनही याच योजनेअंतर्गत अतिरिक्त ६,००० रुपये दिले जातात. त्यामुळे, आता शेतकऱ्यांना वर्षाला एकूण १२,००० रुपयांची आर्थिक मदत मिळते, जी थेट त्यांच्या खात्यात जमा होते.
या ७व्या हप्त्यामध्ये एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीतील अनुदान समाविष्ट आहे. या योजनेमुळे आतापर्यंत एकूण ९३.०९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ११,१३०.४५ कोटी रुपयांचे थेट हस्तांतरण झाले आहे. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.