आमदार संतोष दानवेंची वरूड शिवारात शेतकऱ्यांशी थेट भेट: अडचणी ऐकल्या, विकासाचे आश्वासन!
By गोकुळ सपकाळ

आमदार संतोष दानवेंची वरूड शिवारात शेतकऱ्यांशी थेट भेट: अडचणी ऐकल्या, विकासाचे आश्वासन!
भोकरदन, दि. २६ : शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची भूमिका घेत, आमदार संतोष पाटील दानवे यांनी आज भोकरदन तालुक्यातील वरूड वाघ येथील शेतशिवाराला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शेतीसंबंधीच्या अडचणी आणि अपेक्षा समजून घेतल्या. शेती विकासासाठी सकारात्मक पाऊले उचलण्याचे आश्वासन दानवे यांनी दिले.
आमदार दानवे यांनी या दौऱ्यात विविध शेतांना भेटी देऊन मिरची पिकाची सखोल पाहणी केली. मिरची उत्पादनातील बदल, कीड व रोगराईमुळे येणाऱ्या अडचणींचा त्यांनी शेतकऱ्यांकडून आढावा घेतला. चांगल्या उत्पादनासाठी आधुनिक कीड व्यवस्थापन, माती परीक्षण आणि सेंद्रिय खतांच्या वापराबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यासोबतच, शाश्वत शेतीसाठी सौर ऊर्जेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. सोलार पंपांचा वापर ही काळाची गरज असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होते आणि उत्पादनात वाढ होते, हे पटवून देत या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
“शेती ही आपली संस्कृती आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी निर्णय घेणे आणि योजना अमलात आणणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे,” असे मत आमदार दानवे यांनी यावेळी व्यक्त केले.
दौऱ्याच्या शेवटी, त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करून त्यांचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन दिले. आमदार दानवे यांच्या या प्रत्यक्ष भेटीमुळे आणि मार्गदर्शनामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत त्यांचे मनापासून स्वागत केले.