जळगाव सपकाळमध्ये गावाच्या सहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळेचा मेकओव्हर; ‘बदल’ दिसतोय, ‘गुणवत्ता’ वाढतेय!
By गोकुळ सपकाळ

जळगाव सपकाळमध्ये गावाच्या सहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळेचा मेकओव्हर; ‘बदल’ दिसतोय, ‘गुणवत्ता’ वाढतेय!
जळगाव सपकाळ, दि. १५ : सरकारी शाळा म्हणजे दुर्लक्षित अशी प्रतिमा मोडून काढत, भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेने लोकसहभागाच्या बळावर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. शाळेचे रूप पूर्णपणे बदलले असून, आता ही शाळा कोणत्याही खासगी शाळेला टक्कर देण्यास सज्ज झाली आहे.
उपक्रमांचा खजिना आणि गुणवत्तेची वाटचाल
ही शाळा केवळ शिक्षणापुरती मर्यादित नसून, विविध उपक्रमांचे केंद्र बनली आहे. येथे सुसज्ज प्रयोगशाळा आहे, जिथे केंद्रातील इतर शाळांचे विद्यार्थीही विज्ञानाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी येतात. यासोबतच, स्काऊट गाईड पथक, ढोलपथक आणि लेझीम पथक यांसारख्या सहशालेय उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. नवोदय, स्कॉलरशिप, प्रज्ञाशोध, MNNS अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. विद्यार्थ्यांना इंग्रजीचे १०० शब्द पाठ करण्याचे आव्हान दिले जाते आणि यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन प्रोत्साहित केले जाते.
वाढदिवसाचे अनोखे गिफ्ट: शाळेला नवा लुक
शाळेची प्रगती सुरू असतानाच, शाळेचे रुपडे आणखी आकर्षक करण्यासाठी तरुण गोकुळ सपकाळ (राजे) यांनी पुढाकार घेतला. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शाळेची कंपाऊंड वॉल, ध्वजस्तंभ आणि झाडांना रंगरंगोटी करण्याचा प्रस्ताव मुख्याध्यापक नासेर शेख, शाळा समिती अध्यक्षा वैशाली सपकाळ आणि सर्व शिक्षकांसमोर ठेवला. त्यांनी स्वतः आणि गावातील शिक्षणप्रेमी मित्रांच्या मदतीने लोकसहभागाचे आवाहन केले. गावकऱ्यांनी भरभरून मदत केली आणि आडगावचे उत्कृष्ट पेंटर पंकज घोरपडे यांना कामाचे कंत्राट देण्यात आले.
‘माझी शाळा, माझं गाव’चा नारा
या उपक्रमामुळे शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. मुख्याध्यापक नासेर शेख आणि सर्व शिक्षकवृंद यांनी गावकऱ्यांच्या मदतीचे आभार मानले आहेत. त्यांनी खात्री दिली की, असाच सहभाग मिळत राहिल्यास शाळेचा भौतिक आणि शैक्षणिक विकास निश्चितपणे होईल. शालेय समिती अध्यक्षा वैशाली सपकाळ यांनी ‘लोकसहभाग आणि ग्रामपंचायतीच्या मदतीने शाळा डिजिटल बनवू,’ असा संकल्प व्यक्त केला. गोकुळ सपकाळ यांनी ‘सरकारी शाळा टिकाव्यात यासाठी ग्रामपंचायत, पालक आणि शिक्षणप्रेमींनी एकत्र येऊन गावातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पाऊले उचलावीत,’ असे आवाहन केले.
जळगाव सपकाळच्या या प्रयत्नांनी ‘सरकारी शाळा म्हणजे दुर्लक्षित’ ही कल्पना मागे पडून, ‘लोकसहभागातून आदर्श शाळा’ हे स्वप्न साकार होऊ शकते हे सिद्ध केले आहे.