जालना जिल्ह्यात महसूल पथकाची मोठी कारवाई: अवैध वाळू वाहतूक करणारी ४ वाहने जप्त
By तेजराव दांडगे

जालना जिल्ह्यात महसूल पथकाची मोठी कारवाई: अवैध वाळू वाहतूक करणारी ४ वाहने जप्त
जालना, दि. २४: जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील विशेष महसूल पथकाने धडक मोहीम राबवून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारी दोन हायवा आणि दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत.
भोकरदन तालुक्यात दोन हायवा जप्त
जिल्हाधिकारी मित्तल यांनी स्वतः जालना-राजूर मार्गावर पाहणी करताना दोन हायवामध्ये अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याचे पाहिले. पहिल्या घटनेत, भोकरदन तालुक्यातील राजूर गणपती येथील अनिल रमेश जाधव यांच्या हायवामध्ये चालक आनंद रावसाहेब खिल्लारे विनापरवाना वाळूची वाहतूक करत होता. चौकशी केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे पथकाने सुमारे दोन ब्रास वाळूसह हायवा जप्त केला.
दुसऱ्या कारवाईत, याच मार्गावर देऊळगाव येथील दिनकर बाजीराव जुंबड यांच्या हायवामध्ये चालक गणेश सुदाम नाबदे सुमारे ५ ब्रास वाळू घेऊन जात होता. त्यालाही वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता, तो देऊ शकला नाही. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ हा हायवा देखील जप्त केला.
जाफ्राबादमध्ये दोन ट्रॅक्टर ताब्यात
याच मोहिमेअंतर्गत जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी-राजूर रोडवर महसूल पथकाने दोन अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले. तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही ट्रॅक्टरवर वाहन क्रमांक नव्हते.
पहिल्या प्रकरणात, खापरखेडा येथील विष्णू गणेश म्हस्के यांच्या मालकीचा जॉन डियर ट्रॅक्टर चालक संदीप काशिनाथ इंगळे चालवत होता. हा ट्रॅक्टरही विनापरवाना वाळूची वाहतूक करत असल्याने जप्त करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत, संदीप बाबुराव गोफणे यांच्या सोनालिका कंपनीच्या ट्रॅक्टरला चालक संदीप लिंबाजी रोकडे चालवत होता. हा ट्रॅक्टरही अवैध वाळूने भरलेला होता आणि त्यावर क्रमांक नसल्याने तो देखील जप्त करण्यात आला. जप्त केलेली दोन्ही वाहने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.
या कारवाईत नायब तहसीलदार चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी बी. जी. ब्राम्हणे, अमोल मुरकुटे, एन. एच. पठाण, माधव साळवे, आणि राजू खांडेभराड यांचा समावेश होता.
जिल्ह्यात अवैध वाळू उपसा किंवा वाहतूक करणाऱ्यांवर यापुढे कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिला आहे.