तोंडी आदेशाने नोकरी गेली, आता जीवनही धोक्यात! विनय विद्यालयातील ‘त्या’ कर्मचाऱ्याचा उपोषणाचा तिसरा दिवस; आत्मदहनाचा इशारा!
By गोकुळ सपकाळ

तोंडी आदेशाने नोकरी गेली, आता जीवनही धोक्यात! विनय विद्यालयातील ‘त्या’ कर्मचाऱ्याचा उपोषणाचा तिसरा दिवस; आत्मदहनाचा इशारा!
जळगाव सपकाळ, दि. १५: शिक्षणाच्या मंदिरात ज्ञानाचे धडे देण्याऐवजी एका कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील विनय विद्यालयात, विनोद सपकाळ या कर्मचाऱ्याला कोणतीही पूर्वसूचना किंवा लेखी पत्र न देता, “तुम्ही कामावर येऊ नका,” असे तोंडी सांगून कामावरून कमी करण्यात आले आहे. या अन्यायाविरोधात विनोद सपकाळ यांनी गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे.
आत्मदहनाचा इशारा; प्रशासन निद्रिस्त?
या गंभीर प्रकरणात, शाळेच्या व्यवस्थापनाने त्यांच्या जागेवर दुसऱ्या कर्मचाऱ्याची नेमणूक करण्याचा घाट घातल्याचा आरोप विनोद सपकाळ यांनी केला आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून, त्यांना जीवन संपवण्यास भाग पाडले जात असल्याचं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. विनोद सपकाळ यांनी छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण उपसंचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जर त्यांना लवकर न्याय मिळाला नाही, तर ते १६ ऑगस्ट रोजी आत्मदहन करतील. या घटनेला सर्वस्वी भागुबाई शिक्षण मंडळ जळगाव सपकाळचे संचालक मंडळ जबाबदार असेल, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण?
विनोद सपकाळ हे १५ जून २०१७ पासून विनय विद्यालयात प्रयोगशाळा सहायक म्हणून कार्यरत होते. त्यांचे सर्व शैक्षणिक काम त्यांच्याकडून करून घेण्यात आले. मात्र, सप्टेंबर २०२४ मध्ये सी.पी. झाल्टे यांनी प्राचार्य पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांना तोंडी सूचना देऊन शाळेत येण्यास मनाई केली. विनोद सपकाळ यांनी आपली नियुक्ती रीतसर असूनही जाणूनबुजून वरिष्ठांकडे मंजुरीसाठी आपला प्रस्ताव पाठवला नाही, असा आरोप केला आहे.
या गंभीर प्रकरणाची प्रत जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जालना आणि पारध पोलीस ठाण्यातही देण्यात आली आहे. या प्रकरणी प्रशासन आता तरी दखल घेऊन विनोद सपकाळ यांना न्याय देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.