जालन्यात नोकरीची संधी आणि हवामानाचा इशारा: ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आणि ‘ऑरेंज अलर्ट’
By तेजराव दांडगे

जालन्यात नोकरीची संधी आणि हवामानाचा इशारा: ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आणि ‘ऑरेंज अलर्ट’
जालना, दि. २७ सप्टेंबर २०२५ – जालना जिल्ह्यात आगामी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, तर दुसरीकडे २७ सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
५१९ रिक्त पदांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि मातोश्री स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.
कुठे: मातोश्री स्किल डेव्हलपमेंट सेंटर, अंबड रोड, जालना.
वेळ: सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत (उमेदवारांनी सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे).
पदांची संख्या: एकूण ५१९ रिक्त पदे उपलब्ध.
पात्रता: दहावी, बारावी, आयटीआय, बी.ए., बी.कॉम, बी.एस.सी., एम.कॉम, डिप्लोमा इंजिनिअर, बी.ई. इंजिनिअर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिशियन डिप्लोमा) इत्यादी शैक्षणिक पात्रताधारक महिला व पुरुष उमेदवारांसाठी ही संधी आहे.
या मेळाव्यात १० नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी मुलाखतीसाठी उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने टाटा मोटर्स लिमिटेड पुणे, बजाज ऑटो लिमिटेड छत्रपती संभाजीनगर, पेटीएम सेर्विसेस, भारत फाइनेंशियल सेर्विसेस लिमिटेड आणि युवशक्ती फाऊंडेशन (YSF) छ. संभाजीनगर यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
आवश्यक गोष्टी: १) किमान पाच प्रतींमध्ये रिझ्युमे/बायोडाटा. २) शैक्षणिक कागदपत्रे. ३) आधार कार्ड/सेवायोजन नोंदणी छायाप्रती.
४) ज्या उमेदवारांनी अजून सेवायोजन नोंदणी केली नसेल, त्यांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉग-इन करून जॉब फेअर टॅब वर क्लिक करून उपलब्ध पदांसाठी अर्ज (Apply) करणे आवश्यक आहे.
अडचणी आल्यास कार्यालयीन दूरध्वनी व व्हॉट्सॲप क्रमांक ०२४८२-२९९०३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांनी केले आहे.
जालना जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’; नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन: प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.
२७ सप्टेंबर २०२५: ऑरेंज (Orange) अलर्ट – तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता.
२८ सप्टेंबर २०२५: यलो (Yellow) अलर्ट – तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा (ताशी ३०-४० कि.मी. वेगाने) येण्याची शक्यता.
२९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५: मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता.
या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे: १) मेघगर्जनेच्या वेळी, वीज चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडांखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. २) कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. ३) मोकळे मैदान, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण आणि लटकणाऱ्या तारांपासून दूर राहावे. ४) मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून, हात आणि डोक्याने कान झाकावे आणि जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवावा. ५) शेतकरी बांधवांनी अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा आणि जनावरांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
आपत्कालीन परिस्थितीत, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना ०२४८२-२२३१३२ वर संपर्क साधण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गणेश महाडिक यांनी केले आहे.
नोकरी आणि हवामान या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन जालनेकरांनी योग्य ती तयारी करावी. रोजगार मेळाव्यासाठी जाताना हवामानाचा अंदाज घेऊन वेळेवर पोहोचावे.