अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांवर जालना वाहतूक पोलिसांची कारवाई
By तेजराव दांडगे

अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांवर जालना वाहतूक पोलिसांची कारवाई
जालना, दि. ०५ सप्टेंबर – जालना जिल्हा वाहतूक शाखेने आज केलेल्या कारवाईत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या एका वाहनासह चालकाला ताब्यात घेतले आहे. कन्हैयानगर चौफुली येथे ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी सुमारे १,१५,३२० रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली आहे.
जिल्हा वाहतूक शाखेकडून कन्हैयानगर चौफुली येथे वाहनावरील प्रलंबित दंड वसुलीसाठी एक विशेष मोहीम राबवली जात होती. याच मोहिमेदरम्यान, पोलिसांनी एमएच ०३ सीबी ६९४७ या क्रमांकाच्या एका इटिंगा गाडीला थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान, गाडीमध्ये विदेशी दारूचे एकूण ९ बॉक्स आढळून आले, ज्यात ४८४ बाटल्या होत्या. या दारूची अंदाजे किंमत १,१५,३२० रुपये इतकी आहे.
चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अंकित प्रभाकर वाघ (वय २५, रा. वरुड, ता. जाफ्राबाद, जि. जालना) असे सांगितले. त्याच्याकडे दारू वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांनी दारूचे बॉक्स आणि इटिंगा गाडी (किंमत ४,६५,३२० रुपये) असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी आरोपीत अंकित वाघ याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास चंदनझिरा पोलीस करत आहेत.
ही कारवाई जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये चंदनझिरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री बाळासाहेब पवार, जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी सपोनि चंद्रकांत चातुरे यांच्यासह पोलीस अंमलदार गणेश जाधव, विजय लोखंडे, राजेश दहिवाळ, महंमद चौधरी, गोरखनाथ राठोड आणि नवनाथ पाटील यांचा समावेश होता.