जालना पोलिसांची मोठी कारवाई; दोन बांगलादेशी घुसखोरांचे पश्चिम बंगाल सीमेवरून मायदेशी निर्वासन
By तेजराव दांडगे

जालना पोलिसांची मोठी कारवाई; दोन बांगलादेशी घुसखोरांचे पश्चिम बंगाल सीमेवरून मायदेशी निर्वासन
जालना, दि. २९ डिसेंबर २०२५: जालना जिल्हा पोलीस दलाने बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रियेनंतर पश्चिम बंगाल सीमेवरून बांगलादेशात निर्वासित केले आहे. ही कारवाई जिल्हा विशेष शाखा आणि पारध पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, इमदार हुसेन मोहम्मद उली अहेमद उर्फ सिपॉन (वय २६) आणि हुमायुन कबीर मोहम्मद उली अहमद (वय ४०) हे दोन बांगलादेशी नागरिक कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास होते. याबाबतची माहिती मिळताच, २७ डिसेंबर २०२४ रोजी त्यांच्याविरुद्ध पारध पोलीस ठाण्यात पारपत्र कायदा आणि परकीय नागरिक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा (गु.र.नं. २५७/२०२४) दाखल करण्यात आला होता.
न्यायालयीन प्रक्रिया आणि शिक्षा
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना बेकायदेशीर घुसखोरी आणि वास्तव्याबद्दल दोषी ठरवत एक वर्षाचा कारावास आणि २५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.
अशी झाली निर्वासन (Deportation) प्रक्रिया
शिक्षा पूर्ण झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार केंद्र सरकार आणि बांगलादेश दूतावास यांच्याशी योग्य पत्रव्यवहार करण्यात आला. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, २८ डिसेंबर २०२५ रोजी या दोन्ही घुसखोरांना पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील वैशनबनगर येथे नेण्यात आले. तेथे ११९ वी बटालियन, बॉर्डर सुरक्षा बल (BSF) यांच्या मदतीने त्यांना बांगलादेशात हस्तांतरित करण्यात आले.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
ही महत्त्वाची कामगिरी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केली:
जिल्हा विशेष शाखा: पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार, पुरुषोत्तम देशमुख, शंकर खरात, भाऊसाहेब लहाणे, प्रतापसिंग सुंदरडे, सत्यभामा चव्हाण.
पारध पोलीस ठाणे: सपोनि संतोष माने, पोउपनि नेमाणे, सुभाष जायभाये, गणेश पायघन.
जालना पोलिसांच्या या सतर्कतेमुळे आणि कायदेशीर पाठपुराव्यामुळे बेकायदेशीररित्या राहणाऱ्या परकीय नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात यश आले आहे.





