जालना पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: सोनं-चांदी चोरणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त!
By तेजराव दांडगे

जालना पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: सोनं-चांदी चोरणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त!
जालना, २९ जुलै २०२५: जालना जिल्ह्यातील घनसावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारपिंपळगाव येथे झालेल्या एका मोठ्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीपणे उलगडा केला आहे. सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद करण्यात आले असून, त्यांच्याकडून तब्बल सव्वा तीन किलो चांदी आणि चोरलेली एक कार असा एकूण ७ लाख १९ हजार ८२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जालना आणि इतर जिल्ह्यांतील एकूण पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
काय आहे प्रकरण?
२३ जुलै २०२५ रोजी कुंभारपिंपळगाव येथील ज्ञानेश्वर मधुकर दहीवाळ यांच्या ‘ज्ञानेश्वरी ज्वेलर्स’ दुकानाचे चॅनेल गेट आणि शटरचे कुलूप तोडून चार अज्ञात व्यक्तींनी दुकानात प्रवेश केला. दुकानातून १९ लाख ७६ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची धडाकेबाज कारवाई:
जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी या गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी तपासाची चक्रे फिरवली. २९ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, शक्तीसिंग उर्फ शक्तीमान प्रल्हादसिंग टाक (वय २२, रा. गुरुगोविंदसिंग नगर, जालना) याने त्याच्या तीन साथीदारांसह हा गुन्हा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शक्तीसिंग याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी ५ लाख ६७ हजार ८२० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.
चोरलेली कारही हस्तगत:
याच आरोपीतांनी अंबड येथील रवींद्र बापूराव कारके यांच्या राहत्या घरासमोरून १ लाख ५० हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी अल्टो LXI सिल्व्हर रंगाची कार (एमएच १२ बीएम ८७०६) चोरली होती. ती कारही पोलिसांनी यशस्वीरित्या जप्त केली आहे.
इतर जिल्ह्यांतील गुन्हे उघडकीस:
चौकशीदरम्यान, आरोपीतांनी जळगाव जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोपडे नगर आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळंद येथील मेडिकल फोडल्याचीही कबुली दिली. या कारवाईमुळे एकूण ४ घरफोडीचे आणि १ कार चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपितास पुढील तपासासाठी घनसावंगी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे यांच्यासह स्थागुशाचे अंमलदार सॅम्युअल कांबळे, भाऊराव गायके, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, इरशाद पटेल, संदीप चिंचोले, सतिष श्रीवास, आक्रुर धांडगे, रमेश काळे, धीरज भोसले, कैलास चेके, सौरभ मुळे आणि अशोक जाधवर यांनी केली आहे.