जालना पोलिसांची धडाकेबाज कारवाई: गावठी पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगार जेरबंद!
By तेजराव दांडगे

जालना पोलिसांची धडाकेबाज कारवाई: गावठी पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगार जेरबंद!
जालना, दि. ०३: जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्धच्या मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. स्थानिक गुन्हे शाखेने महेश विष्णू निचळ (रा. शिंदे वडगाव, ता. घनसावंगी, जि. जालना) याला गावठी पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसांसह अटक केली आहे.
१ जुलै २०२५ रोजी जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केलं होतं. हे पथक माहिती गोळा करत असताना, गोपनीय सूत्रांकडून त्यांना माहिती मिळाली की, महेश विष्णू निचळ हा पानेवाडी ते राजेगाव रोडने कमरेला पिस्तूल लावून फिरत आहे. या माहितीच्या आधारे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ पानेवाडी शिवारात सापळा रचला. तिथे त्यांना एक संशयास्पद व्यक्ती आढळली. चौकशी केली असता त्याने आपलं नाव महेश विष्णू निचळ असल्याचं सांगितलं. खात्री पटल्यानंतर, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. त्याच्या कमरेला खोवलेली एक गावठी पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसे पोलिसांना मिळाली.
महेश विष्णू निचळ याच्याविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात कलम ३/२५ आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे (उपविभाग अंबड) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, आणि पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ, देविदास भोजने, इर्शाद पटेल, सागर बाविस्कर, संदीप चिंचोले, दत्ता वाघुंडे, सोपान क्षीरसागर, धीरज भोसले, योगेश सहाने, चालक अशोक जाधवर यांनी केली आहे.
या कारवाईमुळे जालना जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना चांगलाच वचक बसला आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.