जालना पोलिसांची मोठी कारवाई: एकाच दिवशी २२८ विना नंबर प्लेट आणि फॅन्सी नंबर प्लेटच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई
By तेजराव दांडगे

जालना पोलिसांची मोठी कारवाई: एकाच दिवशी २२८ विना नंबर प्लेट आणि फॅन्सी नंबर प्लेटच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई
जालना, दि. १०: रस्त्यांवरील सुरक्षितता आणि वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी जालना पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण मोहिम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०९/१०/२०२५ रोजी जालना जिल्ह्यामध्ये एकाच वेळी नाकाबंदी करत विशेष मोहिम राबवण्यात आली.
या मोहिमेदरम्यान विना नंबर प्लेट आणि फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनांना लक्ष्य करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या कडक तपासणीत तब्बल २२८ दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली. यात ९९ वाहने विना नंबर प्लेटची तर १२९ वाहने फॅन्सी नंबर प्लेट वापरणारी होती.
ताब्यात घेतलेल्या या वाहनांच्या मालकी हक्काची खात्री करून, मोटार वाहन कायद्यानुसार संबंधित वाहनधारकांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभारी अधिकारी आणि शाखा प्रमुखांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, ही कारवाई पुढेही अशीच सुरू राहणार आहे. त्यामुळे, वाहनधारकांनी यापुढे नियमांचे उल्लंघन करू नये.
जालना पोलिसांचे जनतेला आवाहन:
१) आपल्या वाहनांना दिलेल्या नियमानुसार नंबर प्लेट लावावी.
२) वाहन चालवताना मालकी हक्काचे कागदपत्रे (उदा. आर.सी. बुक, इन्शुरन्स) आणि वाहन चालवण्याचा परवाना (Driving License) सोबत बाळगावा.
नियमांचे पालन करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन जालना पोलिसांनी केले आहे.