जालना पोलिसांची मोठी कारवाई; ७३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि कंटेनर जप्त
By तेजराव दांडगे

जालना पोलिसांची मोठी कारवाई; ७३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि कंटेनर जप्त
जालना, दि. २० : जालना जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, एका मोठ्या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर पकडण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि अंबड पोलिसांनी केलेल्या या संयुक्त कारवाईत एकूण ७३ लाख ३० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पाठलाग करून कारवाई
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, १९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांना माहिती मिळाली की, प्रतिबंधित गुटख्याचे वाहन जालना ते बीड रोडने जात आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास संशयित कंटेनर (क्र. MH 18 HZ 2350) दिसताच पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि हॉटेल भारत परिसरात त्याला थांबवले.
मध्यप्रदेशातील आरोपीत ताब्यात
कंटेनरमधील इसमाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपले नाव शिवम नागो देशमुख (रा. मुलताई, जि. बैतुल, राज्य मध्यप्रदेश) असल्याचे सांगितले. वाहनाची झडती घेतली असता पोलिसांना त्यात खालील मुद्देमाल आढळला:
प्रतिबंधित गुटखा: राजनिवास, विमल, रजनिगंधा, BABA-120 आणि जाफरानी जर्दा (किंमत ४३,०८,२५० रुपये).
कंटेनर वाहन: (किंमत ३०,००,००० रुपये).
मोबाईल: दोन मोबाईल संच (किंमत २२,००० रुपये).
असा एकूण ७३ लाख ३० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करून आरोपीताला ताब्यात घेण्यात आले आहे.
या पथकाने केली कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ आणि पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोउपनि भागवत कदम, पोउपनि दुबे, पोहेकॉ यशवंत मुंडे, दिपक चव्हाण, अरुण मुंडे, निखिल गायकवाड, प्रताप सुंदर्डे आणि विशाल सोळुंके यांचा समावेश होता.
अंबड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.



