जालना पोलिसांची धडक कारवाई: पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी उकळणाऱ्या दोघांना मुद्देमालासह बेड्या!
By तेजराव दांडगे

जालना पोलिसांची धडक कारवाई: पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी उकळणाऱ्या दोघांना मुद्देमालासह बेड्या!
जालना, ०६ जुलै २०२५: एका हाय-प्रोफाईल खंडणी प्रकरणात जालना स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी बजावली आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून एका व्यापाऱ्याचे अपहरण करून ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २ लाख १० हजार रुपयांच्या मुद्देमालासह पिस्तुलासह जेरबंद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जालना शहरात खळबळ उडाली आहे.
काय घडलं होतं?
२९ जून २०२५ रोजी चंदन बसंतीलाल गोलेच्छा (वय ४९, किराणा दुकान व्यावसायिक, जालना) यांना अज्ञातांनी पिस्तुलाचा धाक दाखवला. “तुझी सुपारी मिळाली आहे, जीव वाचवायचा असेल तर ५० लाख रुपये दे,” अशी धमकी देऊन त्यांचे अपहरण करण्यात आले. आरोपीतांनी सुरुवातीला त्यांच्याकडून ४ लाख रुपये उकळले होते. या घटनेनंतर ३० जून २०२५ रोजी चंदन गोलेच्छा यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. भारतीय न्याय संहिता कलम नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांची चक्रे फिरली!
या गंभीर गुन्ह्याची दखल घेत जालना पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी आरोपीतांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीतांच्या मागावर होते. आरोपीतांनी आपले मोबाईल बंद करून पळ काढल्याने पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले होते.
पाठलाग करून आरोपीतांना पकडले!
५ जुलै २०२५ रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, गुन्ह्यातील आरोपीत अक्षय रविंद्र गाडेकर आणि विठ्ठल भीमराव अंभोरे हे दोघे विशाल कॉर्नर, जालना बायपास रोडवर एका काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलसह थांबले आहेत. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांना पाहताच आरोपीतांना संशय आला आणि त्यांनी मोटारसायकल जागेवर सोडून शेतात पळ काढला. मात्र, पथकातील अधिकारी व अंमलदारांनी त्यांचा सुमारे दीड किलोमीटर पाठलाग करून मोठ्या शिताफीने दोघांनाही पकडले.
गुन्हेगारांनी दिली कबुली!
अटक करण्यात आलेले आरोपीत अक्षय रविंद्र गाडेकर (वय २२, रा. पिंपळगाव शेरमुलकी, ता. भोकरदन, जि. जालना) आणि विठ्ठल भीमराव अंभोरे (वय २५, रा. द्वारकानगर, जालना) यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी आपला तिसरा साथीदार राहुल रत्नाकर गंगावणे (रा. चांधई एक्को, ता. भोकरदन) याच्यासह चंदन गोलेच्छा यांचे अपहरण करून पिस्तुलाचा धाक दाखवत ४ लाख रुपयांची खंडणी घेतल्याची कबुली दिली.
मुद्देमालासह आरोपीत जेरबंद!
पोलिसांनी या आरोपीतांच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, रोख ७७,००० रुपये, एक स्प्लेंडर मोटारसायकल आणि तीन मोबाईल असा एकूण २,१०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईमध्ये अजयकुमार बंसल, पोलीस अधीक्षक जालना, आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक जालना, अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. पंकज जाधव, सपोनि. योगेश उबाळे, जगदीश बावणे, रुस्तुम जैवाळ, कैलास खाडे, दीपक घुगे, सागर बाविस्कर, किशोर पुंगळे, सचिन राऊत, धीरज भोसले, अशोक जाधवर (चालक) या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.