जालना पोलिसांची मोठी कारवाई! सागर धानुरे हत्येचा छडा; २५ लाखांची सुपारी देणाऱ्यासह मारेकरी २४ तासांत गजाआड
By तेजराव दांडगे

जालना पोलिसांची मोठी कारवाई! सागर धानुरे हत्येचा छडा; २५ लाखांची सुपारी देणाऱ्यासह मारेकरी २४ तासांत गजाआड
जालना, दि. २२ (प्रतिनिधी): जालना शहरातील कदीम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सागर धानुरे याच्या हत्येचा गुंता उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या २४ तासांत यश आले आहे. सुरुवातीला आत्महत्येचा वाटणारा हा प्रकार प्रत्यक्षात पैशांच्या वादातून रचलेला हत्येचा कट असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
घटनेची पार्श्वभूमी
२१ डिसेंबर २०२५ रोजी जालना येथे सागर धानुरे याचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, मृतदेहाची स्थिती आणि प्राथमिक तपासणीत पोलिसांना घातपाताचा संशय आला. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
असा उघड झाला कट
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरली. पोलिसांनी कल्याण गणपतराव भोजने (वय ४१, रा. समर्थ नगर) याला संशयावरून ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
तपासात समोर आलेली धक्कादायक माहिती:
पैशांचा वाद: आरोपीत कल्याण भोजने आणि मयत सागर धानुरे यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून जुना वाद होता.
सुपारीचा व्यवहार: सागरच्या त्रासाला कंटाळून कल्याणने त्याला संपवण्याचा कट रचला. यासाठी त्याने कमलेश झाडीवाले याला २५ लाख रुपयांची सुपारी दिली होती.
हत्येची घटना: २० डिसेंबरच्या रात्री सागरला कलावती हॉस्पिटलसमोर बोलावण्यात आले. तेथे कारमध्ये कमलेश झाडीवाले याने सागरवर गावठी पिस्तुलने गोळ्या झाडल्या आणि चाकूने वार करून त्याची हत्या केली.
आरोपीताचा कावेबाजपणा
गुन्हा केल्यानंतर आरोपीत कमलेश झाडीवाले अत्यंत सावध होता. हत्येनंतर तो स्वतःला वाचवण्यासाठी मयताच्या मित्रांसोबत पोस्टमार्टमसाठी छत्रपती संभाजीनगरलाही गेला होता. मात्र, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याला नागेवाडी टोलनाक्याजवळ सापळा रचून अटक केली.
पोलीस पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. दोन्ही आरोपीतांना पुढील तपासासाठी कदीम जालना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास कदीम जालना पोलीस करत आहेत.



