जालना: राजमाता लॉजवर पोलिसांचा छापा, कुंटणखाना चालवणाऱ्यासह ३ आरोपीत जेरबंद
By तेजराव दांडगे

जालना: राजमाता लॉजवर पोलिसांचा छापा, कुंटणखाना चालवणाऱ्यासह ३ आरोपीत जेरबंद
जालना, १० सप्टेंबर – जालना बस स्थानक परिसरातील राजमाता लॉजमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. या कारवाईत कुंटणखाना चालवणाऱ्या लॉज मॅनेजरसह एकूण तीन आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, राजमाता लॉजमध्ये एक व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय चालवत असल्याची खबर मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले.
या आदेशानुसार, १० सप्टेंबर २०२५ रोजी पोलिसांनी राजमाता लॉजवर छापा टाकला. त्यावेळी लॉजचा मॅनेजर कृष्णा दौलतराम हरदेकर (वय ३८, रा. संभाजीनगर, जालना) हा लॉजमधील एका खोलीत बाहेरून महिलांना आणून वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी कृष्णा हरदेकरसह इतर तीन पुरुष आरोपीतांनाही अटक केली. यात रवि रामदास जाधव (वय ३५), गजानन श्रीराम जाधव (वय ३२) आणि दिपक विष्णू जोशी (वय २२) यांचा समावेश आहे. हे तिघेही मजूर आहेत आणि सेवली, जालना येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी आरोपीतांकडून २,२८० रुपये रोख रक्कम जप्त केली असून, या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. या सर्व आरोपीतांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये सपोनि योगेश उबाळे, सपोनि सचिन खामगळ आणि पोउपनि राजेंद्र वाघ यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या इतर कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला.