जालना पोलिसांची धडक कारवाई: गावठी पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसांसह एक ताब्यात
By तेजराव दांडगे

जालना पोलिसांची धडक कारवाई: गावठी पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसांसह एक ताब्यात
जालना, दि. ०५ सप्टेंबर २०२५: जालना जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनांनंतर, स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (०५ सप्टेंबर २०२५) एका व्यक्तीला गावठी पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसांसह अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक माहिती गोळा करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, प्रवीण संतोष तायडे (वय २३, रा. गोकुळवाडी, जालना) नावाचा व्यक्ती बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल बाळगत आहे.
या माहितीच्या आधारे, पोलिसांनी जालना शहरात प्रवीण तायडे याचा शोध घेतला असता, तो खरपुडी चौफुली येथील इंडियन ढाब्यासमोर आढळून आला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्तूल (अग्निशस्त्र) आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
या पिस्तुलाचा पुरवठा कोणी केला, याबाबत विचारणा केली असता प्रवीण तायडे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, सपोनि सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ आणि स्थागुशाचे अंमलदार गोपाल गोशिक, लक्ष्मीकांत आडेप, प्रभाकर वाघ, भाऊराव गायके, रमेश राठोड, सागर बाविस्कर, सतीश श्रीवास, इरशाद पटेल, रमेश काळे, कैलास चेके, अशोक जाधवर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.