जालना पोलीस दलाचे नागरिकांना शांतता आणि सतर्कतेचे आवाहन
By तेजराव दांडगे

जालना पोलीस दलाचे नागरिकांना शांतता आणि सतर्कतेचे आवाहन
जालना, दि. ९ मे २०२५: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, जालना पोलीस दलाने जिल्ह्यातील नागरिकांना शांतता राखण्याचे आणि सतर्क राहण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, नागरिकांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.
‘आपला भारत एक आहे आणि या परिस्थितीत आपण सर्वांनी एकजूट दाखवून देशाप्रतीची आपली जबाबदारी निभावणे गरजेचे आहे,’ असे आवाहन पोलीस दलाने केले आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत एकोपा कायम ठेवावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.
या संवेदनशील परिस्थितीत सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणतीही माहिती अधिकृत सरकारी स्रोतांकडूनच तपासून घ्या. सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवणे कायद्याने गुन्हा आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानकडून सायबर हल्ल्याची शक्यता लक्षात घेता, सोशल मीडिया वापरताना अनोळखी आणि संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणे टाळा. आपली वैयक्तिक आणि आर्थिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे.
लष्करी आणि निमलष्करी दलांच्या हालचालींसंबंधी कोणतीही माहिती, मग ती प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष, सोशल मीडियावर किंवा इतर कोणत्याही माध्यमातून प्रसारित करू नये. यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.
स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी केल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. शाळा, कार्यालये आणि वाहतूक व्यवस्थेत बदल झाल्यास, त्यासंबंधीची अधिकृत माहिती प्रशासनाकडून दिली जाईल.
आपल्या आजूबाजूला कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल दिसल्यास, त्वरित पोलीस किंवा प्रशासनाशी संपर्क साधा. नागरिकांची सतर्कता हीच पोलिसांची ताकद आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नागरिकांनी जातीय सलोखा आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी प्रयत्न करावेत. कोणत्याही परिस्थितीत जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये. ‘भारत एक मजबूत आणि सजग देश आहे. नागरिकांनी शांतता, संयम राखावा आणि देशाच्या सुरक्षेसाठी जागरूक राहावे,’ असे आवाहन पोलीस अधीक्षक, जालना यांनी केले आहे.
या कठीण परिस्थितीत जालना पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे आणि नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.