जालना एलसीबीची मोठी कारवाई; जालना, पुणे आणि अहिल्यानगरमधून दुचाकी चोरणारा सराईत जेरबंद
By तेजराव दांडगे

जालना एलसीबीची मोठी कारवाई; जालना, पुणे आणि अहिल्यानगरमधून दुचाकी चोरणारा सराईत जेरबंद
जालना, दि. २०: जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जालना पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडाकेबाज कारवाई करत जालना, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि पुणे येथून मोटारसायकल चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्याकडून तीन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे बिडकीन येथून अटक
जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. आरोपी सुनील दशरथ डोंगरे (वय ३८ वर्ष, रा. धावेडी, ता. जि. जालना) याच्याकडे चोरीच्या मोटारसायकली असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला बिडकीन (छत्रपती संभाजीनगर) येथून ताब्यात घेतले.
गुन्ह्याची कबुली आणि तीन दुचाकी जप्त
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने जालना शहरातील गोल्डन ज्युबली शाळेजवळील पांजरपोळ गौशाळा रोडवरून ‘होंडा शाईन’ मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अधिक चौकशीत त्याने इतर दोन ठिकाणच्या चोऱ्यांचीही माहिती दिली:
श्रीरामपूर (अहिल्यानगर): येथून ‘होंडा युनिकॉर्न’ मोटारसायकल चोरली होती.
शिरूर (पुणे): येथील पोस्ट ऑफिस जवळून ‘हिरो एच.एफ. डिलक्स’ मोटारसायकल लांबवली होती.
पोलिसांनी या तिन्ही मोटारसायकली जप्त केल्या असून आरोपीवर विविध पोलीस ठाण्यांत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, सपोनि सचिन खामगळ, पीएसआय राजेंद्र वाघ आणि एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
टीप: ही बातमी पोलीस रेकॉर्डवर आधारित असून गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने जनजागृतीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.



