Jalna: अवैध वाळू वाहतूक प्रकरणी गोंदी पोलिसांची धडक कारवाई
By तेजराव दांडगे

Jalna: अवैध वाळू वाहतूक प्रकरणी गोंदी पोलिसांची धडक कारवाई
गोंदी, दि. १७ : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या आरोपीतांविरुद्ध गोंदी पोलिसांनी मोठी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. आरोपीतांकडून १ कोटी ६० लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक १४/१०/२०२५ रोजी पहाटे ३.०० वाजता गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांना शहागड येथील जिल्हा परिषद शाळेसमोर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत चोरटी वाळू भरत असल्याची माहिती मिळाली.
श्री. खांडेकर यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक हावळे, पोलीस हवालदार हजारे, पोलीस हवालदार केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप हवाळे, आणि पोलीस कॉन्स्टेबल शेख यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन खात्री केली. पहाटे ४.०० वाजता जिल्हा परिषद शाळेकडून मुख्य रस्त्याकडे येणारा एक ट्रॅक्टर दिसला. यावेळी ट्रॅक्टर चालकाला ‘लोकेशन’ देणाऱ्या आरोपीने इशारा करताच, वाळूने भरलेला ट्रॅक्टर घेऊन चालक पळून गेला.
पोलिसांनी तात्काळ लोकेशन देणारा आरोपी संदीप रमेश धोत्रे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक सेलटॅक्स कार (क्र. MH 21 BQ 7455) आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात आरोपी संदीप रमेश धोत्रे (लोकेशन देणारा) आणि ट्रॅक्टर पळवून नेणारा आरोपी हरीचंद्र लहू धोत्रे (रा. शहागड, ता. अंबड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण १,६०,०५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नेपणी, उपविभागीय पोलीस अधिकारी (अंबड) सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पो. हवालदार हजारे, पो. हवालदार केंद्रे, पो. काँ. प्रदीप हवाले आणि पो. काँ. शेख (सर्व गोंदी पोलीस ठाणे) यांनी यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास पो. हवालदार केंद्रे करत आहेत.