जालना: राजूर येथे संसार भांडे संचासाठी कामगारांकडून पैशांची मागणी; ऑनलाईन नोंदणीतही अडथळे
By गौतम वाघ

जालना: राजूर येथे संसार भांडे संचासाठी कामगारांकडून पैशांची मागणी; ऑनलाईन नोंदणीतही अडथळे
जालना, भोकरदन (राजूर) दि. २५ : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या राजूर येथील कामगार कल्याण कॅम्पमध्ये, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या (BOCW) योजनेअंतर्गत ‘संसार भांडे संच’ घेण्यासाठी आलेल्या कामगारांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नियमांनुसार हे संसार भांडे विनामूल्य मिळणे अपेक्षित असताना, कॅम्पमधील काही लोकांकडून त्यासाठी ₹500 ची मागणी केली जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. या प्रकारामुळे कामगारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
‘ऑनलाईन साईट’ बंद असल्याचा बहाणा
संसार भांडे संच घेण्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासून थांबलेल्या सिद्धार्थ दिगंबर दाभाडे या कामगारांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, सकाळपासून केवळ अकरा लोकांची ऑनलाईन नोंदणी केली गेली. त्यानंतर, ‘ऑनलाईन साईट चालत नाही’ असे कारण देऊन नोंदणी थांबवण्यात आली. दाभाडे यांनी त्यांच्या ओळखीच्या काही जाणकार व्यक्तींना बोलावले असता, त्यांनी अवघ्या ५ मिनिटांत १० लोकांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली. यामुळे, पैसे मिळवण्यासाठी मुद्दामून ‘ऑनलाईन साईट’ चालत नसल्याचे कारण दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पैशांशिवाय भांडे नाही?
या कॅम्पमध्ये आलेल्या अनेक कामगारांनी पैशांची मागणी केली जात असल्याची प्रतिक्रिया दिली. एका कामगाराने सांगितले की, ‘संसार भांड्यासाठी ₹500 मागितले, माझ्याकडे नव्हते म्हणून मला सायंकाळी साडेचार वाजले तरी भांडे मिळाले नाही.’ एका कामगार महिलेने तर सकाळी ७ वाजल्यापासून उपाशीपोटी थांबूनही पैसे न दिल्यामुळे भांडे न मिळाल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, ‘आमचे दिवसाचे सहा ते सातशे रुपये बुडवून आम्ही आलोय. आजची तारीख दिली असतानाही उद्या येण्यास सांगितले जात आहे. उद्या कसे भांडे देणार, हे कळत नाही.’
पावतीवरही स्पष्ट सूचना
मधुकर श्रीरंग कांबळे या कामगारांनीही या प्रकाराला दुजोरा दिला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘पैसे दिले तरच भांडे देतात आणि नाही दिले तर देत नाहीत.’ आणखी एका कामगार महिलेनेही ₹500 ची मागणी केली जात असल्याचे सांगितले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एका कामगाराने दिलेल्या माहितीनुसार, मंडळाच्या पावतीवर स्पष्टपणे नमूद केलेले आहे की, ‘संसार भांडे हे विनामूल्य असून एक रुपयाही द्यायचा नाही.’
या गंभीर प्रकारामुळे, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चांगल्या योजनेलाही काही गैरप्रवृत्तींमुळे गालबोट लागत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी कामगारांकडून केली जात आहे.