जालना: चमडा बाजारात गोवंश कत्तल करणाऱ्यावर धाडसी कारवाई!
By तेजराव दांडगे

जालना: चमडा बाजारात गोवंश कत्तल करणाऱ्यावर धाडसी कारवाई!
जालना, १३ जुलै २०२५: जालना शहराच्या चमडा बाजारात आज सकाळी एक थरारक कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलिसांनी गोवंश कत्तल करून मांस विकणाऱ्या एका आरोपीताला रंगेहाथ पकडले. तब्बल १३० किलो गोमांसासह २७,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामुळे गोवंश तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात गोवंश कत्तलीच्या घटना वाढल्या होत्या. यावर लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या. याच सूचनांनुसार, श्री. जाधव यांनी एक खास पथक तयार करून या टोळ्यांचा शोध सुरू केला.
आज १३ जुलै रोजी चमडा बाजार, जालना येथील एका गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. एका घरात गोवंशाची कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याची खबर मिळताच, स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचे पथक त्वरीत चमडा बाजार येथील मशिदीमागे पोहोचले. तिथे त्यांनी अब्दुल वहाब अब्दुल अजीज (वय ५२, रा. चमडा बाजार मस्जिदच्या पाठीमागे, जालना) याला त्याच्या राहत्या घरातच गोवंशीय मांस कत्तल करून विक्री करताना रंगेहाथ पकडले.
पोलिसांनी अब्दुल वहाबच्या घरातून २६,००० रुपये किमतीचे १३० किलो गोवंशीय मासांचे तुकडे, १,८०० रुपये किमतीच्या तीन लोखंडी सुऱ्या, वजन काटा आणि वजनमापे असा एकूण २७,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीताविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ५७२/२०२५, कलम ५ (क), ९ (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सदर बाजार पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, सपोनि योगेश उबाळे, सपोनि. आनंदसिंग साबळे, पोउपनि राजेंद्र वाघ, तसेच स्थागुशाचे अंमलदार रामप्रसाद पव्हरे, प्रभाकर वाघ, इरशाद पटेल, अशोक जाधवर आणि सदर बाजार पोलीस ठाणेचे अंमलदार संतोष खरात, गिरीश शिंगणे, संदीप पवार, यश देशमुख यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
या धडक कारवाईमुळे जालना जिल्ह्यात गोवंश संरक्षणासाठी पोलीस दल किती कटिबद्ध आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.