Jalna: थोरले शाहू महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक पारध येथे उभारणार, १५ कोटींचा खर्च अपेक्षित
By तेजराव दांडगे

Jalna: थोरले शाहू महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक पारध येथे उभारणार, १५ कोटींचा खर्च अपेक्षित
पारध, दि. ०१ : भोकरदन तालुक्यातील पारध येथे थोरले छत्रपती शाहू महाराज यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारले जाणार आहे. मराठ्यांचा गौरवशाली इतिहास भावी पिढीला कळावा, या उद्देशाने आमदार संतोष पाटील दानवे यांच्या मागणीनंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत या स्मारकाला प्राथमिक मंजुरी देण्यात आली आहे.
१० दिवसांत जागेचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
थोरले शाहू महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील पहिली लढाई पारध येथे जिंकली होती आणि त्यानंतर काही काळ त्यांनी येथे वास्तव्य केले होते. या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व लक्षात घेऊन, आमदार संतोष पाटील दानवे यांनी या स्मारकाची मागणी केली होती. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे आणि स्वयम सामाजिक संस्था यांनी या स्मारकाची संकल्पना मांडली आहे.
या संदर्भात झालेल्या बैठकीत, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी १० दिवसांच्या आत जागेची पाहणी करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीला सुधीर थोरात, रवींद्र सासमकर आणि जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
स्मारकासाठी दोन जागांची पाहणी, १५ कोटींचा अंदाज
स्मारकासाठी सुमारे ५ एकर जागा आवश्यक असून, यासाठी दोन संभाव्य जागांची पाहणी करण्यात आली आहे. पहिली जागा पारध येथील जुना पराशर मुनी मंदिर परिसर आहे आणि दुसरी जागा छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील तपासणी नाका आहे. यापैकी हेरिटेज विभाग ज्या जागेला पसंती देईल, तिथे स्मारकाची निर्मिती होईल.
या स्मारकासाठी १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचा अंदाज जिल्हा परिषदेने व्यक्त केला आहे. शासनाने यासाठी आर्किटेक्ट नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत.

स्मारकामुळे महाराष्ट्राला नवी ओळख मिळेल
आमदार संतोष पाटील दानवे यांनी या स्मारकामुळे केवळ पारधच्याच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या वैभवात भर पडणार असल्याचे म्हटले आहे. पारध हे पौराणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेले गाव म्हणून ओळखले जाईल, असेही ते म्हणाले.
राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य रवींद्र सासमकर यांनी आमदार संतोष पाटील दानवे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि हे स्मारक तालुक्याला नवी ओळख देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच स्थानिक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
ग्रामस्थ सागर देशमुख यांनी आमदार संतोष पाटील दानवे यांचे आभार मानत, या स्मारकामुळे पारध गावाला छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने नवी ओळख मिळेल, अशी भावना व्यक्त केली.