जालना: पारध येथे जश्ने ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न
'जश्ने ईद-ए-मिलाद' निमित्त पारधमध्ये रक्ताचं नातं!

जालना: पारध येथे जश्ने ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न
‘जश्ने ईद-ए-मिलाद’ निमित्त पारधमध्ये रक्ताचं नातं!
पारध, दि. ५ सप्टेंबर: माणूसकी आणि सामाजिक एकोप्याचा अनोखा संदेश देत, जश्ने ईद-ए-मिलाद-उन-नबी ﷺ च्या शुभ मुहूर्तावर जालना जिल्ह्यातील पारध येथे एका भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. ५ सप्टेंबर २०२५ रोजी मोहम्मदिया शादी हॉलमध्ये उत्साहात पार पडलेल्या या शिबिरात समाजातील सर्व स्तरातील लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
या शिबिराचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे, “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या मंत्राने प्रेरित होऊन शेकडो युवक-युवती, विद्यार्थी आणि वयोवृद्धांनीही पुढाकार घेतला. मानवतेच्या सेवेसाठी सर्व समाजघटक एकत्र आल्यामुळे खरंच रक्ताचं नातं किती मोठं आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
शिबिराचं उद्घाटन पारध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी अशा समाजोपयोगी कार्यांमध्ये प्रत्येकाने सहभागी होण्याचं आवाहन केलं. आयोजकांनी रक्तदानाचं महत्त्व पटवून देताना, वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
या सोहळ्याला मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अजहर पठाण, तसेच अजीज शेख, माजी जिल्हा परिषद सभापती मनीष श्रीवास्तव, हाफीज खलील, सलीम खान, शेख आबेद, उपसरपंच शेखर श्रीवास्तव, नसीर शेख, लतीफ शेख, साबेर शेख, निसार शेख, हाफीज शाहरुख, मुफ्ती इम्रान, मुफ्ती अबुसाद, प्रा. संग्राम देशमुख, एन. एम. लोखंडे, बबलु तेलंग्रे, समाधान बोडखे, अमोल भुसारे, अनुज श्रीवास्तव, बाबा खान, समी खान, बाबुखान, सर्व गावकरी बांधव आणि पत्रकार मंडळी उपस्थित होती.
रक्तदान केलेल्या सर्व दात्यांचा सत्कार करून त्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली, तसंच त्यांच्यासाठी अल्पोपहाराची सोयही करण्यात आली होती. या यशस्वी उपक्रमाने पारध परिसरात सामाजिक ऐक्य आणि बंधुता आणखी मजबूत झाली आहे. विशेषतः तरुणाईच्या पुढाकारामुळे पारधमध्ये रक्तदान चळवळ अधिक वेगाने पुढे जात असल्याचं आशादायक चित्र या वेळी दिसून आलं.