ब्रेकिंग: गोंदी पोलिसांची धडक कारवाई! महामार्गावरील ‘महाकाळ’ रॉबरीचा पर्दाफाश, दोन आरोपी जेरबंद!
By तेजराव दांडगे

ब्रेकिंग: गोंदी पोलिसांची धडक कारवाई! महामार्गावरील ‘महाकाळ’ रॉबरीचा पर्दाफाश, दोन आरोपी जेरबंद!
जालना, (गोंदी) १९ जून २०२५: राष्ट्रीय महामार्ग ५२ वर ट्रक चालकांना लुबाडणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला गोंदी पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. महाकाळा येथील थरारक रॉबरीचा अवघ्या काही तासांत छडा लावत, पोलिसांनी तब्बल ३६ लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.
घडले असे की, बिदरकडे कंपनीचा माल घेऊन जाणारे ट्रक चालक लालसिंग अहीरवार (ट्रक क्रमांक MH20DE4106) यांना महाकाळा गावाजवळ दोन अज्ञात व्यक्तींनी हात दाखवून थांबवले. ट्रक थांबताच, या गुन्हेगारांनी चालकाच्या डोळ्यात काहीतरी टाकून त्याला ट्रकबाहेर ओढून बेदम मारहाण केली. यानंतर, मालवाहू ट्रकसह फरार झाले.
या घटनेची माहिती मिळताच, गोंदी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी ट्रक चालक लालसिंग अहीरवार यांना तातडीने सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर पोलिसांनी आपले ‘खाकी’ चक्र फिरवले आणि तपासाची सूत्रे वेगाने हलवली.
गोंदी पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि अवघ्या काही तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. बंडू उर्फ रामेश्वर भीमराव वाघमारे (रा. महाकाळा) आणि समाधान बबन बेद्रे (रा. अंकुश नगर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, चोरीस गेलेला ट्रक आणि त्यातील कंपनीचा सर्व माल असा एकूण ३६,३३,११५ रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे. गोंदी पोलीस ठाण्यात आरोपींविरोद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही कौतुकास्पद कामगिरी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक, आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड, विशाल खांबे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडली. सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक किरण हावले, पोहेकॉ रामदास केंद्रे, पोकों शाकिरोद्दीन सिद्दीकी आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल वैद्य यांच्या गोंदी पोलीस ठाण्यातील पथकाने अत्यंत प्रशंसनीय कार्य केले आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण हावले हे करत आहेत. गोंदी पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे महामार्गावरील गुन्हेगारांना जरब बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.