जळगाव सपकाळच्या केंद्रशाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग Result; विद्यार्थिनींच्या यशाने शाळेची मान उंचावली!
By गोकुळ सपकाळ

जळगाव सपकाळच्या केंद्रशाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग Result; विद्यार्थिनींच्या यशाने शाळेची मान उंचावली!
जळगाव सपकाळ (प्रतिनिधी): नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे, पुणे यांच्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, जळगाव सपकाळच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट यश मिळवून शाळेचे नाव रोशन केले आहे. जळगाव सपकाळची केंद्रशाळा नेहमीच विविध उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखली जाते आणि यावर्षीच्या निकालाने या शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शाळेने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विशेष मार्गदर्शन वर्ग आणि जादा तासिकांमुळे हे यश प्राप्त झाले आहे. इयत्ता आठवीमधून कु. जानवी मयूर सपकाळ हिने शिष्यवृत्ती मिळवली आहे, तर इयत्ता पाचवीमधून कु. संस्कृती दीपक जोशी, साक्षी पंजाब सपकाळ, प्रिया विशाल सपकाळ आणि शीतल अशोक सपकाळ या चार विद्यार्थिनींनी परीक्षेत पात्रता मिळवली आहे.
या नेत्रदीपक यशाबद्दल केंद्रप्रमुख बी. यू. सपकाळ, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सपकाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोकुळ सपकाळ, सदस्य गणेश सपकाळ, शाळेचे मुख्याध्यापक नासेर शेख आणि सर्व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
याप्रसंगी आयोजित कौतुक सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या शैक्षणिक कार्याची प्रशंसा केली आणि या यशाबद्दल शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशस्वी विद्यार्थिनींना शाळेतील शिक्षक अशोक आराक, नितीन बाहेकर, रुपेश टाकळकर, अनिल सपकाळ, सुभाष साबळे, विजय पंडीत, श्री. गायकवाड, श्रीमती मानसी देशमुख मॅडम, श्रीमती सुरेखा मिसाळ मॅडम आणि श्रीमती भेंडाळे मॅडम या शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हे यश मिळाल्याचे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले आणि या यशाचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे सांगितले.