तोंडी आश्वासनानंतर उपोषण मागे; जळगाव सपकाळ येथील शिक्षकाचा लढा यशस्वी
By गोकुळ सपकाळ

तोंडी आश्वासनानंतर उपोषण मागे; जळगाव सपकाळ येथील शिक्षकाचा लढा यशस्वी
जळगाव सपकाळ, दि. १६ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील विनय विद्यालयातील शिक्षक विनोद शालिकराम सपकाळ यांनी शाळेतून कमी केल्याच्या विरोधात पुकारलेले उपोषण अखेर मागे घेतले आहे. शालेय प्रशासनाकडून लेखी नसले तरी, वैयक्तिक मान्यता प्रस्ताव पाठवण्याचे तोंडी आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी आपला लढा थांबवला.
विनोद सपकाळ यांनी १२ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले होते आणि १६ ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांची प्रकृती बिघडल्याने शालेय प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाचे संचालक मंडळ, प्राचार्य आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांना तात्काळ दिलासा मिळाला.
शाळेचे प्राचार्य सी. पी. झाल्टे, मातोश्री भागुबाई शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सचिव व्ही. के. सपकाळ, संचालक डॉ. व्ही. एच. सपकाळ, पी. टी. सपकाळ, जी. के. सपकाळ, डॉ. एच. डी. सपकाळ यांच्यासह ग्रामस्थ गणपू नाना सपकाळ, मधु अप्पा सपकाळ, माधवराव नाना सपकाळ, सुभाष बापू सपकाळ, हिम्मतराव पाटील, बंकु सपकाळ, शालिकराम सपकाळ, जी. एस. सपकाळ, रमेश बापू सपकाळ, गोकुळ सपकाळ, दीपक सपकाळ, विनोद इंगळे, ज्ञानु टेलर आदींनी या वेळी मध्यस्थी केली.
सर्व संचालक मंडळ आणि प्राचार्यांनी वैयक्तिक मान्यता प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर विनोद सपकाळ यांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले. हा निर्णय त्यांच्यासाठी तात्पुरता विजय मानला जात असून, या तोंडी आश्वासनाची पूर्तता कधी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.