ज्ञानेश्वर-तुकाराम महाराजांच्या विचारांनी मानवाचा उद्धार: विष्णू महाराज सास्ते
पारध नगरीत २५ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता; सास्ते महाराजांचे विचारमंथन

ज्ञानेश्वर-तुकाराम महाराजांच्या विचारांनी मानवाचा उद्धार: विष्णू महाराज सास्ते
पारध नगरीत २५ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता; सास्ते महाराजांचे विचारमंथन
पारध, दि. ११: भोकरदन तालुक्यातील पारध बु येथील २५ व्या अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वर पारायण सोहळा आणि श्रीमद् भागवत कथेची नुकतीच सांगता झाली. यानिमित्त रात्रीच्या सेवेत ह.भ.प. विष्णू महाराज सास्ते यांनी आपले विचार मांडले.
महाराज म्हणाले की, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचे विचार मानवी जीवनाला तारून नेतात. मानवाला नेहमीच सद्बुद्धीची गरज असते, कारण तीच त्याच्या उद्धाराला कारणीभूत ठरते. त्यामुळे, संतांनी नेहमीच परमेश्वराकडे प्रार्थना केली की, आपल्या मनात कधीही दुर्बुद्धी येऊ नये आणि भगवंताचे नाम सदैव स्थिर राहावे. जीवनात एकदा परमार्थिक भाव निर्माण झाला की, तो भगवंताच्या कृपेने पूर्णत्वाला जातो, आणि हाच खरा मोठा लाभ आहे, असे चिंतन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी एकत्रीकरण आणि संघटनेचे महत्त्वही सांगितले. श्रावण मासातील रक्षाबंधन या सणाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, हा सण भारतीय संस्कृतीतील बहिण-भावाच्या नात्याचे प्रतीक आहे, जिथे बहिण आपल्या रक्षणाची जबाबदारी भावावर सोपवते.
महर्षी पराशर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या नगरीत आणि राजर्षी शाहू महाराजांच्या अधिष्ठानाखाली हा अखंड सप्ताह यशस्वीपणे पार पडल्याबद्दल त्यांनी समस्त गावकरी आणि उपस्थित महाराज मंडळींचे अभिनंदन केले.