सरपंच मंगेश साबळेंचे हटके आंदोलन: घरकुलाच्या हप्त्यासाठी लाच मागणार्यांना अनोख्या पद्धतीने सुनावले
गळ्यात बूट, तोंडावर चिखल... घरकुलासाठी लाच मागणार्यांविरुद्ध सरपंचांचे भीक मागो आंदोलन

सरपंच मंगेश साबळेंचे हटके आंदोलन: घरकुलाच्या हप्त्यासाठी लाच मागणार्यांना अनोख्या पद्धतीने सुनावले
फुलंब्री (प्रतिनिधी): फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे आपल्या आंदोलनांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याची त्यांची पद्धत सर्वांचेच लक्ष वेधून घेते. याच भूमिकेतून सरपंच साबळे यांनी आज फुलंब्री पंचायत समिती कार्यालयासमोर अत्यंत आगळेवेगळे आंदोलन केले.
सरपंच मंगेश साबळे यांनी आज चक्क रस्त्यावर उतरून भीक मागितली! त्यांच्या तोंडावर चिखल लावलेला होता, अंगावर फाटके कपडे होते आणि गळ्यात चक्क बूट अडकवलेले होते. या वेशात त्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उभे राहून नागरिकांकडून भीक मागितली.
या आंदोलनामागील कारण सांगताना सरपंच साबळे म्हणाले की, घरकुल योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी पंचायत समितीमधील काही अधिकारी २५ हजार रुपयांची टक्केवारी मागत आहेत. या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी आणि प्रशासनाचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे भीक मागो आंदोलन केले.
मंगेश साबळे यांनी दिवसभर भीक मागून जमा केलेले पैसे थेट फुलंब्रीचे तहसीलदार आणि संबंधित अभियंता यांच्या नावाने सुपूर्द केले. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांकडून या कृतीचे समर्थन केले जात आहे. आता या गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.