जालना जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पालकमंत्री पंकजा मुंडे आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी; नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे आश्वासन
By तेजराव दांडगे

जालना जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पालकमंत्री पंकजा मुंडे आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी; नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे आश्वासन
जालना, दि. २४ : जालना जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज तातडीने पाहणी दौरा केला. दोन्ही मंत्र्यांनी पूरग्रस्त गावांना भेट देऊन नागरिकांना आणि शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच, बाधित झालेल्यांना तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले.
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी
जिल्ह्यात गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परतूर तालुक्यातील गोळेगाव, घनसावंगी तालुक्यातील भेंडाळा, कुंभार पिंपळगाव, मच्छिंद्रनाथ चिंचोली आणि अंबड तालुक्यातील सुखापुरी, शहापूर या गावांना भेटी दिल्या. त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी, “पंचनामे सुरू असले तरी पूरग्रस्त भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. शासन नागरिकांच्या पाठीशी असून, कोणीही काळजी करू नये,” असे सांगितले. तसेच, गोळेगाव येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुनर्वसनाचा प्रश्न पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. बेघर झालेल्या नागरिकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. ज्या ठिकाणी ६५ मिमीपेक्षा कमी पाऊस झाला असला तरी जास्त नुकसान झाले असेल, तेथेही पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
या दौऱ्यात आमदार बबनराव लोणीकर, आमदार हिकमत उढाण, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतीचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमठाणा (ता. बदनापूर) आणि ढाकलगाव (ता. अंबड) येथील शेतशिवार गाठले. यावेळी त्यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. “काळजी करू नका, शासन आपल्यासोबत आहे,” असा धीर त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
“एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही,” असे सांगतानाच, तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. कपाशी, सोयाबीन तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पशुधनाचे आणि घरांचीही पडझड झाली आहे.
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेली आहेत किंवा वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. शेवटी ते म्हणाले की, “राज्याचा कृषिमंत्री म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभा आहे. संकटाच्या या काळात शासन तुमच्यासोबत आहे.”
यावेळी आमदार नारायण कुचे यांच्यासह महसूल, कृषी, पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.