गोंदी पोलिसांची वाळू माफियांवर मोठी कारवाई: ४५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक!
By तेजराव दांडगे

गोंदी पोलिसांची वाळू माफियांवर मोठी कारवाई: ४५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक!
जालना, २१ जुलै: गोंदी पोलिसांनी वाळू माफियांविरुद्ध धडक कारवाई करत ४५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, यामध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा चालकाचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे डोणगाव शिवारात NH 52 हायवेवर पोलीस उपनिरीक्षक हावले आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास केंद्रे हे गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना MH20GZ2545 क्रमांकाचा भारतबेंज कंपनीचा एक हायवा संशयास्पदरीत्या जाताना दिसला. त्यांनी थांबवून तपासणी केली असता, चालक दुर्गासिंग काशिराम मरमट (रा. परतूर) हा विनापास-परवाना अंदाजे ३०,००० रुपये किमतीची ५ ब्रास वाळू वाहतूक करताना आढळला.
चौकशीदरम्यान, चालकाने सांगितले की तो वाहनाच्या मालकाच्या सांगण्यावरून वाळूची वाहतूक करत होता. तसेच, त्याला वशीम हासम पठाण (रा. नवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि एका अनोळखी व्यक्तीकडून मदत मिळत होती.
या प्रकरणी गोंदी पोलिसांनी दुर्गासिंग काशिराम मरमट, वशीम हासम पठाण, वाहन मालक आणि अनोळखी व्यक्ती अशा चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हायवासह एकूण ४५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयूष नोपाणी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (अंबड) विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक किरण हावले, आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास केंद्रे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण हावले हे करत आहेत.