गोंदी पोलिसांची धडक कारवाई: 7 वाळूचोर अटकेत, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त!
By तेजराव दांडगे

गोंदी पोलिसांची धडक कारवाई: 7 वाळूचोर अटकेत, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त!
जालना, दि. 18 : गोंदी पोलिसांनी वाळू चोरांविरोधात मोठी कारवाई करत 7 आरोपीतांना अटक केली असून, तब्बल 22 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक ट्रॅक्टर लोडर, चार ट्रॅक्टर आणि एक बुलेट जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 16/06/2025 रोजी सहायक पोलीस निरीक्षक आशिष श्रीनिवास खांडेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गंगा चिंचोली शिवारात गोदावरी नदीपात्रात छापा टाकला. त्यावेळी काही इसम ट्रॅक्टर लोडरच्या साहाय्याने अवैध वाळूचे उत्खनन करून तिची चोरटी वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी पाठलाग करून एक ट्रॅक्टर लोडर पकडला, तर इतर ट्रॅक्टर पळून जाण्यात यशस्वी झाले. जप्त केलेला ट्रॅक्टर लोडर गोंदी पोलीस ठाण्यात जमा करून आरोपीतांविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या एका कारवाईत, शहागड गाव शिवारात गोदावरी नदीपात्रात केणीच्या मदतीने वाळू काढत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तिथेही छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच वाळूचोर ट्रॅक्टरसह पळून गेले. मात्र, गुप्त बातमीदारांच्या मदतीने तीन वाळू चोरांची नावे निष्पन्न करण्यात आली आणि घटनास्थळी एक बुलेट गाडी आढळल्याने ती जप्त करण्यात आली. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 223/2025, कलम 303(2), 3(5) भारतीय न्यायसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 22,00,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये युवराज दिगंबर गुळवणे, द्वारकादास भीमराव गुळवणे, कृष्णा निवृत्ती धाये, कृष्णा गंगाधर शिंदे (सर्व रा. कोठाळा खुर्द ता. अंबड), संजय सुभाष उंबरे, गणेश शांतीलाल उंबरे आणि आकाश मधुकर पेटाळे (तिघे रा. शहागड ता. अंबड) या सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड विशाल खांबे, आणि सहा. पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मणे आणि पो. हवा. रामदास केंद्रे हे या गुन्ह्यांचा अधिक तपास करत आहेत. गोंदी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर वचक बसण्यास मदत होणार आहे.