जालना एमआयडीसीमध्ये कामगाराला लुटणारी टोळी जेरबंद: चंदनझिरा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
By तेजराव दांडगे

जालना एमआयडीसीमध्ये कामगाराला लुटणारी टोळी जेरबंद: चंदनझिरा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
जालना एमआयडीसीमध्ये दरोडा टाकणाऱ्या ३ जणांच्या टोळीला चंदनझिरा पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने एका मजुराला लुटले होते. त्यांच्याकडून मोबाईल, खंजीर आणि दुचाकीसह ४८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जालना, १८ जुलै २०२५: जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरात १७ जुलै रोजी रात्री एका परराज्यातील कामगाराला खंजीरचा धाक दाखवून मारहाण करत मोबाईल हिसकावल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी चंदनझिरा पोलिसांनी तात्काळ सूत्रे फिरवत अवघ्या २४ तासांत तीन दरोडेखोरांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा माल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी रात्री हा प्रकार घडला. चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार केले. या पथकाने १७ व १८ जुलै रोजी जालना शहरातील रेकॉर्डवरील आरोपीत (१) विशाल संतोष टाकळकर (वय २०, रा. नूतन वसाहत जालना), (२) विजय अशोक गायकवाड (वय १९, रा. नूतन वसाहत जालना) आणि (३) संतोष सुनील आघाम (वय २६) यांचा गुप्त बातमीदारांच्या मदतीने शोध घेऊन त्यांना अटक केली.
या आरोपीतांकडून लुटीतील विवो कंपनीचा ८,००० रुपये किमतीचा मोबाईल, गुन्हा करण्यासाठी वापरलेला मोठा खंजीर आणि हिरो होंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची ४०,००० रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ४८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, ए.एस.आय. मन्सूब वेताळ, पोहेकॉ. प्रशांत देशमुख, राजेंद्र ठाकूर, कृष्णा तंगे, रविंद्र देशमुख, राजेंद्र पवार, साई पवार, अभिजीत वायकोस, सागर खैरे आणि चालक शेवगण यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
या टोळीकडून जिल्ह्यातील इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुढील तपास पोहेकॉ कृष्णा तंगे हे करत आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क:
पोलीस ठाणे चंदनझिरा जि. जालना
ई-मेल: pschandanzira.jalna@mahapolice.gov.in
दूरध्वनी: ८४५९६१०४८४