पारध बुद्रुक येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न; ३४० नागरिकांनी घेतला लाभ
By तेजराव दांडगे

पारध बुद्रुक येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न; ३४० नागरिकांनी घेतला लाभ
पारध (जालना): येथील स्व. हरिवंशराय बच्चन सेवाभावी संस्था आणि लाल बहादूर शास्त्री सांस्कृतिक युवा क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, स्व. शरदचंद्रजी हिरालालजी श्रीवास्तव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३४० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून, ३५ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे.
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
शिबिराचे उद्घाटन पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती मनीष श्रीवास्तव, सरपंच श्रीमती काकफळे, उपसरपंच शेखर श्रीवास्तव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, डॉ. खान, जगदीश लोखंडे, प्रताप देशमुख, ठाकूर, समाधान तेलंग्रे, कैलास दांडगे, गजानन देशमुख, अजहर पठाण आणि संदीप क्षीरसागर उपस्थित होते.
३५ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया
छत्रपती संभाजीनगर येथील लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे डॉ. संदीप गायकवाड आणि त्यांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली. तपासणी दरम्यान ३५ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. या सर्व रुग्णांवर लॉयन्स नेत्र रुग्णालय येथे मोफत शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
नागरिकांना मिळाला मोठा दिलासा
स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित या शिबिराचा गावातील गरजू, वृद्ध आणि अपंग नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. ग्रामीण भागातील लोकांसाठी ही सेवा अत्यंत मोलाची ठरली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले. विक्रांत श्रीवास्तव यांनी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाचे आभार मानले.



